तालुक्‍यातील वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्‍वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व काही हेमाडपंती मंदिरे आहेत. मात्र, या मंदिरांच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत.
तालुक्‍यातील वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्‍वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व काही हेमाडपंती मंदिरे आहेत. मात्र, या मंदिरांच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत.

अक्षम्य दुर्लक्ष!  गडचिरोलीतील आरमोरी तालुक्‍यात अनेक प्राचीन मंदिरांची दयनीय अवस्था

आरमोरी (जि. गडचिरोली) : अगदी महाभारत काळाशी आपला संबंध दर्शविणाऱ्या आरमोरी तालुक्‍यातील अनेक अतिप्राचीन व ऐतिहासिक वारश्‍यांकडे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील प्राचीन मंदिर आता भगवान भरोसे असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

तालुक्‍यातील वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्‍वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व काही हेमाडपंती मंदिरे आहेत. मात्र, या मंदिरांच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत. वैरागड येथील या अनमोल स्थळांची दुर्दशा मन खिन्न करणारी आहे. वैरागड गावाच्या पूर्वेला वैलोचना नदीच्या तीरावर गोरजाई मंदिर आहे. मागील 10 वर्षांपासून माना समाज बांधव डिसेंबर महिन्यात याठिकाणी यात्रा भरवितात. 

शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराची भग्न अवस्था झाली आहे. मंदिराच्या घुमटाची गोरजाई देवस्थान समितीने थोडीफार दुरुस्ती केली. पण मंदिराच्या सुरेख सभामंडपाचे दगड फुटले आहेत. शेकडो वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करीत असलेल्या मंदिराचा बराच भाग जीर्ण झाला आहे. ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाने 2015 मध्ये हाती घेतले. चार-पाच वर्षे किल्ल्याच्या दर्शनी भागातील मुख्य दरवाजाच्या दुरुस्तीचे काम चालले. जानेवारी 2020 पासून किल्ल्याच्या 1945 च्या प्राचीन स्मारक तथा पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष 1958 च्या अंतर्गत वैरागड येथील किल्ला, भंडारेश्‍वर मंदिर पुरातत्त्व स्थळ म्हणून घोषित केले आहे. 

भंडारेश्‍वर मंदिराच्या डागडुजीचे काम बऱ्याच प्रमाणात झाले. परंतु सध्या काम ठप्प असल्याचे दिसून येते. येथे पायऱ्या करून आजूबाजूचा परिसर स्वच्छ केल्याने भाविक व पर्यटकांसाठी काही प्रमाणात सोयीचे झाले असले, तरी येथे अनेक सुविधांचा अभाव आहे. या अतिसुंदर हेमाडपंती मंदिराचा इतिहास, त्याची संपूर्ण माहिती असलेले फलक लावणे आवश्‍यक आहे, शिवाय येथे रोषणाईची गरज आहे, येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी बसायला बाक, पिण्याचे स्वच्छ पाणी, मागे नदीच्या भागात एखादी सुंदर बाग, अशा आवश्‍यक सुविधा करता येतात. पण, याकडे कायमच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा सगळा ऐतिहासिक वारसा खंगत आहे.

पर्यटन विकासाची संधी...

आरमोरी तालुकाच नव्हे, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कित्येक ऐतिहासिक मंदिरे, वाडे, गडकिल्ले व अनेक वास्तू आहेत. त्यांचा योग्य विकास करून दमदार प्रसिद्धी केल्यास पर्यटन विकासाची चांगली संधी निर्माण होऊ शकते. गडचिरोलीसारख्या उद्योगविहिन जिल्ह्यात पुरातत्त्व पर्यटन, वन व कृषी पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. पण, यासंदर्भात अद्याप प्रशासन स्तरावर कोणताही विचार होताना दिसत नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com