दिवसा चालवायचा पानठेला अन रात्री... पैसे कमावण्याचा शाॅर्टकट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

चोरट्यांकडून आतापर्यंत चार लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोने व रोख 15 हजार असा चार लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अजय हा सराईत चोरटा असून, दोघांकडून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.

यवतमाळ : पैसा कमावण्यासाठी घेतलेला ‘शॉर्टकट’अर्थात गुन्हेगारीचा मार्ग हा पोलिस ठाण्यातच पोहोचवतो, हे निश्चित. दिवसा पानठेला चालवायचा आणि रात्री घरफोडी करणार्‍या दोन चोरट्यांना गजाआड करण्यात आले. शनिवारी (ता.25) अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली.

अजय सुरेश तेलंग (वय 24, रा. आठवडीबाजार), विलास लक्ष्मण शिंदे (वय 21, रा. आठवडीबाजार, झोपडपट्टी), अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे सोने व रोख 15 हजार रुपये जप्त करण्यात आले. डीबी पथकाला मिळालेल्या टीपवरून त्यांनी अजय तेलंग व विलास शिंदे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. 2019 या वर्षात पाच घरफोडी व जानेवारी या महिन्यात तीन असे एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली.

चोरट्यांकडून आतापर्यंत चार लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोने व रोख 15 हजार असा चार लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अजय हा सराईत चोरटा असून, दोघांकडून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.

- पहाटे उठून सडा व रांगोळी टाकताय... ही घ्या काळजी

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने सपोनि विवेक देशमुख, परसराम अंभोरे, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सुधीर पुसदकर, सलमान शेख, सागर चिरडे, प्रकार चरडे यांनी केली.

‘त्या’चोरीमुळे सुगावा
विदर्भ हाउसिंग सोसायटी येथील पुष्पा जोधाणी (वय 74) यांच्या घरून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा एकूण 71 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीची तक्रार त्यांनी दोन जानेवारीला अवधुतवाडी पोलिसांत दिली होती. याच चोरीमुळे पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one booked for theft in yavatmal