वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूरमध्ये एकजण ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मूल (जि. चंद्रपूर) - जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना आज, सोमवारी (ता. 16) दुपारी दोन वाजताच्या सुमारास चिचाळा येथील कम्पार्टमेंट क्रमांक 749 परिसरात घडली. मृताचे नाव मारुती आशन्ना निरुडवार (वय 58) आहे. ते गावा-गावांमध्ये जाऊन पोहे विकायचे. निरुडवार जंगलात सरपण जमा करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना झुडपात नेले. सकाळी गेलेले निरुडवार अद्याप आले नाहीत, या चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. त्यांना ते मृतावस्थेत आढळून आले.

दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी चिचाळा येथील झुडपी जंगलात वाघाने बैलावर हल्ला केला होता. मात्र, बैलाने सुखरूप सुटका करून घेतली होती. याठिकाणी एकच वाघ असून, पाण्याच्या शोधात तो गावाशेजारी फिरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाघाचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप सोमवारी लावले असून, त्याला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: one death in tiger attack