बामणी प्रोटिन्स कंपनीत रसायनाच्या टाकीत जीव गुदमरून एकाचा मृत्यू, पाच गंभीर

मंगेश बेले
Friday, 30 October 2020

बल्लारपूर शहरालगत बामणी प्रोटिन्स ही हाडांपासून प्रोटिन पावडर तयार करण्याची कंपनी आहे. नेहमीप्रमाणे टँकची स्वच्छता करण्यासाठी ६ कर्मचारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास १५ फूट खोल टाकीत उतरले होते.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर)- बामणी प्रोटिन्स येथील टँकची स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या ६ कामगारांपैकी एकाचा जीव गुदमरून जागेवरच मृत्यू झाला, तर इतर गंभीर आहे. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विशाल वसंतराव मावलीकर (३०), असे या मृताचे नाव असून अस्वस्थ कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

बल्लारपूर शहरालगत बामणी प्रोटिन्स ही हाडांपासून प्रोटिन पावडर तयार करण्याची कंपनी आहे. नेहमीप्रमाणे टँकची स्वच्छता करण्यासाठी ६ कर्मचारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास १५ फूट खोल टाकीत उतरले होते. मात्र, टाकीत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने विशाल वसंतराव मावलीकर या कामगाराचा जागेवरच मृत्यू झाला, तर शैलेश गावंडे (वय३६), बंडू निवलकर (३५), मनोज परशुराम मडावी (वय-३२), कपिल परशुराम मडावी (वय- ३३), अविनाश वासुदेव चौधरी (वय- ३६), या कामगारांना अस्वस्थ वाट लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहेत.

हेही वाचा - पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा १४ वर्षांपासून वनवास, देवसरीमधील ९९ कुटुंबीय अद्यापही वाऱ्यावरच

अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर नगर परिषदेची रुग्णवाहिका अल्पावधीतच घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर कामगार आणि परिसरातील गावातील लोकांनी काही काळ गर्दी केली होती. मात्र, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जमाव कमी केला. 

झालेली घटना दुःखद असून, मृतक आणि गंभीर व्यक्तीच्या आम्ही पाठीशी आहोत. कारखान्याच्या वतीने त्यांना परिपूर्ण मदत दिली जाईल.
-सतीश मिश्रा, व्यवस्थापक, एच. आर. विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died and five affected due to chemical in tank at ballarpur of chandrapur