विटभट्टीसाठी वीजचोरी करणे बेतले मजुरांच्या जीवावर; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

दशरथ जाधव
Sunday, 29 November 2020

शेतालगत असलेल्या वर्धमनेरी केंद्राच्या लघुदाब विद्युत वाहिनीवरून त्याने या यंत्रासाठी चोरीचा वीजपुरवठा घेतला होता. यासाठी वापरत असलेला केबल ठिकठिकाणी तुटला असल्याने त्यातील एक तार यंत्राला चिपकली.

आर्वी ( जि.वर्धा ) : अवैधरित्या सुरू असलेल्या विट्टभट्टीवर घेतलेला अनधिकृत वीज प्रवाह काम कारणाऱ्या मजुरांच्या जिवावर बेतला. यात एका कामगाराचा मत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता.28) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भट्टीमालक येथील यंत्र चालविण्यासाठी चोरीची वीज वापरत असल्याचे पुढे आले आहे. एवढेच नाही तर ही वीटभट्टीही अवैध असल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - आता हेल्मेट आणि कॉलेजबॅग बाळगणारे असणार पोलिसांच्या रडारवर; चेनस्नॅचिंगच्या घटना...

दत्ता मारोती सिडाम (वय 35), असे मृताचे नाव असून तो संजयनगर येथील रहिवासी आहे, तर गजानन व पठाण अशी जखमींचा नावे आहेत. बैरमबुवा परिसरातील बाबू हरेल यांच्या पडीक शेतात नरेश गाडगे हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून विटा काढण्याचे काम करीत आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी त्याने विटा थोपाईचे विद्युत यंत्र आणले. शेतालगत असलेल्या वर्धमनेरी केंद्राच्या लघुदाब विद्युत वाहिनीवरून त्याने या यंत्रासाठी चोरीचा वीजपुरवठा घेतला होता. यासाठी वापरत असलेला केबल ठिकठिकाणी तुटला असल्याने त्यातील एक तार यंत्राला चिपकली. त्यामुळे यंत्रामध्ये विद्युत प्रवाह संचारला आणि याचा झटका मशीनवर काम करीत असलेल्या कामगारांना बसला. दत्ता सिडाम व त्याच्यासोबत काम करणारे दूर फेकले गेले. यात दत्ता सिडामचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी असून दुसरा किरकोळ जखमी आहे.

हेही वाचा - नागरिकांनो, मेट्रोचा वापर करा, प्रदूषण टाळा; तब्बल दोन...

याची माहिती मिळताच ठाणेदार संजय वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक ज्योत्सना गिरी, कृष्णा उईके, जयपाल मुंद्रे आदींनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता निखिल दातीर, गणेश बर्वे, वर्धमनेरी केंद्राचे ललित शिंगारे, शैलेश चरडे हे घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी विद्युत केबल, मेन व विद्युत पुरवठा घेण्यासाठी वापरलेले इतर साहित्यसुद्धा जप्त केले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.  

हेही वाचा - धक्कदायक! विक्रीपत्र न करताच कोराडी जगदंबा मंदिराची जमीन केली दुसऱ्याच्या नावे; पोलिसांत तक्रार...

अनेक वर्षांपासून विद्युत चोरी - 
गेल्या अनेक वर्षांपासून वीटभट्टी मालक वर्धमनेरी केंद्राच्या लघुदाब वाहिनीवरून अवैधरीत्या वीजपुरवठा घेऊन मोठ्या प्रमाणात वीजचोरी करीत होता. मात्र, यापासून वीजवितरण विभागाचे कर्मचारी अनभिज्ञ होते, तर वीट कारखाना हा जंगल शिवारात असल्यामुळे याचा लाभ उचलत तो रात्रीच्या सुमारास वीजचोरी करीत होता. 

हेही वाचा - काय सांगता! इथे चक्क बदकं देताहेत अनेकांना रोजगार; राज्यातील एकमेव पैदास केंद्र

विटभट्ट्यांच्या परवानगीचा मुद्दा ऐरणीवर - 
हिवाळा येताच विटभट्ट्यांच्या कामांना प्रारंभ होतो. विटभट्ट्या लावण्यासाठी शासनाकडून परवाना घेणे अनिवार्य आहे. अशातच आर्वीत घडलेल्या या प्रकारामुळे सुरू होत असलेल्या भट्ट्यांची परवानगी तपासणे गरजेचे झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died and two are injured in electric shock in arvi of wardha