बुलडाण्यात वीज पडल्याने एक ठार, दोन मुले गंभीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडत आहे. दरम्यान, काल (मंगळवार)सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन दुपारपासून विजांचा कडकडाट सुरू होता. दुपारी अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू तर दोन मुले गंभीर जखमी झाले. तर, एक बैलही मृत्युमुखी पडला.

बुलडाणा : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडत आहे. दरम्यान, काल (मंगळवार)सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन दुपारपासून विजांचा कडकडाट सुरू होता. दुपारी अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू तर दोन मुले गंभीर जखमी झाले. तर, एक बैलही मृत्युमुखी पडला.

गेल्या तीन दिवसांपासून बुलढाणा शहरासह जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. रविवारी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. काही भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान अचानक विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली.

बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील श्रीराम शेषराव जाधव (५०) यांचाही विज पडल्याने मृत्यू झाला. तर, जळगाव जामोद येथील दोन मुले हे गावालगत आंबाच्या झाडावर चढलेले असताना वीज कोसळली. यात, जळगाव जामोद येथील सिद्धार्थनगरातील आर्यन बांगर (१२) व अजय गोंधळे (१५) हे दोघे शेतामध्ये गेले असता झाडाखाली उभे असताना विज कडाडून झाडावर पडली. या अपघातात दोघेही भाजलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पुढील उपचारार्थ खामगाव येथे पाठविले. त्यानंतर त्यांना अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोताळा तालुक्यातील इब्राहीमपूर येथे विज पडून एक बैल ठार झाला आहे. शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीवर वीज पडल्याने एक बैल जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. बैलजोडी मालक शेतकरी मधुकर गणपत आमले यांचे शेत शिवारातील गट नं.११३ मध्ये आहे. बैलजोडीचे एकूण नुकसान ९० हजार झाले असून तलाठी नितीन धोंडे, पशुविकास अधिकारी सागर ठोसर, पशुधन पर्यवेक्षक नितीन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

रुग्णवाहिका नादुरुस्त
जळगाव जामोद येथील घटना घडल्यानंतर गंभीर असलेल्या मुलांना प्राथमिक उपचार करून खामगाव येथे पाठवायचे होते. परंतु, येथील रुग्णवाहिकाच नादुरुस्त असल्याने मुलांच्या उपचारासाठी एक ते दीड तास विलंब करावा लागला. यानंतर खासगी व्यवस्था करत त्यांना रवाना करण्यात आले. यावेळी नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

Web Title: One killed and two children injured due to electricity in Buldhana

टॅग्स