esakal | ट्रॅव्हल्स अन् मालवाहूची धडक; एक ठार, तर १० जनावरांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

representative image
ट्रॅव्हल्स अन् मालवाहूची धडक; एक ठार, तर १० जनावरांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती ते नागपूर महामार्गावर रहाटगाव रिंगरोडवरील एका लॉनसमोर खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची प्रवासी बस आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात वाहनातील क्‍लीनर ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी (ता. 20) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा: कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

नासीर अहमद शेख निसार (वय 25, रा. बिसमिल्लानगर, अमरावती), असे मृत क्‍लीनरचे नाव असल्याचे नांदगावपेठ पोलिसांनी सांगितले. तो जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनावर कार्यरत होता. तर, त्याच वाहनाचा चालक संगम दीपक मोहोड (वय 30, रा. अंबाडा) याच्यासह ट्रॅव्हल्स चालक सलीम खान अकबर खान (वय 50, रा. औरंगाबाद), अशी जखमींची नावे असल्याचे नांदगावपेठ पोलिसांनी सांगितले. एमएच 20 ईएल 0800 क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स बस औरंगाबादवरून नागपूरला जात होती. तर विरुद्ध दिशने एमएच 27 बीएक्‍स क्रमांकाची पीकअप व्हॅन येत होती. त्यामध्ये आठ गायी आणि दोन गोऱ्हे, अशी दहा जनावरे होती. सदर वाहन मोर्शीवरून अमरावतीकडे येत होते. रिंगरोडवरील एका लॉनसमोर वळण घेत असताना जनावरांचे वाहन अचानक ट्रॅव्हल्सच्या समोर आल्याने या दोन्ही वाहनात जोरदार धडक झाली. अपघातात पीकअप व्हॅनमध्ये असलेल्या आठ गायी आणि दोन गोऱ्हे, अशी दहा जनावरे जागीच मरण पावली. तर जनावरांच्या वाहनातील क्‍लीनरही जागीच ठार झाला. सदर वाहन धडकेनंतर घासत गेल्याने त्याची दोन्ही चाके दूरवर फेकल्या गेली. समोरील भागाचा चुराडा झाला. तर ट्रॅव्हल्स समोरच्या भागाचे नुकसान झाले. नांदगावपेठ पोलिसांनी याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक सलीम खान व जनावरांच्या वाहनाचा चालक संगम मोहोड या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.