विद्यार्थ्यांच्या तृष्णातृप्तीला अस्वच्छतेचा घोट; एक हजार ११७ शाळांत पाणी पिण्यासाठी नळच नाही

One thousand 117 schools do not have drinking water in Chandrapur district
One thousand 117 schools do not have drinking water in Chandrapur district

चंद्रपूर : काही वर्षांपासून शाळांच्या पायाभूत विकासावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात येत आहे. या निधीतून शाळांमध्ये ई-लर्निंग, बोलक्‍या भिंती, शौचालय यांसह अन्य सुविधांवर भर देण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा नळ लावण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे.

जिल्ह्यातील तब्बल एक हजार ११७ शाळांमध्ये नळाची सुविधाच नाही. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना विहीर किंवा हातपंपाच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. अलीकडेच जलजीवन मिशन राबविण्यात आले. यातूनच ही बाब उघड झाली आहे. आता ज्या शाळांमध्ये नळ नाही, तेथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
 
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांत टप्प्याटप्प्याने ई-लर्निंगची सुविधा केली. त्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला.

जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी ई-लर्निंगच्या माध्यमातूनच शिक्षण घेत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. खासगी शाळांतही बऱ्यापैकी सुविधा आहेत. मात्र, अनेक शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी नळच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विहीर अथवा हातपंपाचे अशुद्ध पाणी प्यावे लागते. यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याचा धोका अधिक आहे.

काही दिवसांपूर्वी देशातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांत नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पंतप्रधानांनी शंभर दिवसांच्या एका विशेष मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेचे नाव जलजीवन मिशन आहे. या मिशनअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, खासगी शाळा, शासकीय आश्रमशाळा, खासगी आश्रमशाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात त्या शाळांत पाण्याची कोणती सुविधा आहे, याची माहिती घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ११७ शाळांमध्ये नळाची सुविधाच नसल्याची माहिती समोर आली.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजार, तर खासगी ४६१ शाळा आहेत. शासकीय आश्रमशाळा १४, तर खासगी आश्रमशाळा १६ आहेत. जिल्ह्यात एकूण दोन हजार ६१ शासकीय आणि खासगी शाळा आहेत. त्यापैकी ९४४ शासकीय आणि खासगी शाळांत नळाची सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३१२ शाळांत विहिरीचे पाणी पिऊन विद्यार्थी आपली तहान भागवतात, तर ८०५ शाळांतील विद्यार्थ्यांना हातपंपांचा आधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. आता ज्या शाळांत नळाची सुविधा नाही. तेथे नळ कनेक्‍शन करण्याची कार्यवाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. काही ठिकाणी त्याची सुरुवातही झाली आहे.

लवकरच सगळ्याच शाळांत नळ कनेक्‍शन
अनेक शाळांत नळाचे कनेक्‍शन नाही. जिथे नाही तिथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून नळ कनेक्‍शन लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच सगळ्याच शाळांत नळ कनेक्‍शन लावण्यात येईल. 
- दीपेंद्र लोखंडे,
शिक्षणाधिकारी (प्रा.), जिल्हा परिषद, चंद्रपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com