#SundaySpecial : वन 'वूमेन' आर्मी असलेल्या खासदार भावना गवळी

bhavna-gawli
bhavna-gawli

योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही असे म्हटले जाते. विविध घटना तसेच अनुभवावरून हे वेळोवेळी सिद्ध झालेले आपण पाहतो. सलग पाचव्यांदा खासदारपदी विराजमान झालेल्या भावना गवळी या सुद्धा राजयोग घेऊनच जन्माला आल्याचं दिसून येते. माजी खासदार स्व. पुंडलीकराव गवळी यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेऊन वयाच्या 24 व्या वर्षी 1999 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळविल्याने, त्यांनी राजकीय वर्तुळात आपले स्वतंत्र स्थान निश्‍चित केले आहे.

युवा नेतृत्वावर विश्‍वार ठेवून, भावना यांनी अनेक दिग्गजांच्या विरोधात निवडणूक जिंकल्याने राजकारणातील पुरूषसत्ताक मानसिकतेत त्या "वन वूमेन आर्मी' ठरल्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यवतमाळ हा विदर्भातील मोठा जिल्हा आहे. कापूस हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पादन. तसे विणकाम, विडी, कागद, साखर, जिनींग - स्पिनींग आणि तेल उद्योगही या जिल्हयात आहे. यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके आहेत. या संपूर्ण भागात पाणीटंचाईची समस्या आहे. यवतमाळ - वाशिम मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला.

माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या भावना गवळी यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते अनंतराव देशमुख यांचा पराभव करून पहिल्यांदा विजय मिळवला. त्यानंतर त्या सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. खासदारकीच्या आपल्या 20 - 22 वर्षाच्या काळात भावना गवळी यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामेही मोठ्या प्रमाणावर केली आहेत. जबरदस्त जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

बास्केट बॉल, टेनिस आणि स्विमींग
भावना यांना बास्केट बॉल, टेनिस आणि स्विमींग या खेळांची आवड आहे. राजकारणात आल्यापासून या सर्वांना वेळ देता येत नाही. कधी यवतमाळ तर कधी वाशिम असा मुक्काम करावा लागतो. याशिवाय दिल्ली, मुंबई वाऱ्याही सुरूच असतात. कार्यकर्त्यांच्या गराड्यात आणि लोकांच्या प्रश्‍नात आपले खासगी जीवन कधीच संतुष्टात आले असल्याचे भावनाताईंनी मनोमन मान्यच केले आहे.

चौघी बहिणी आणि आईशी भावनिक नाते
माजी खासदार पुंडलीकराव गवळी यांना चार मुली. भावना गवळी या सर्वात लहान. मुलगा झाला नाही याचे दुःख पुंडलिकरावांनी कधीही व्यक्त केले नाही. उलट मुलींनाच मुलाप्रमाणे वागवीत, सर्व क्षेत्रात पुढे येण्यास प्रोत्साहन दिले. भावना यांना सुरूवातीपासूनच राजकीय वर्तुळात वावरण्याची सवय असल्याने, त्यांनी आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवीत, राजकारणातच करीअर करायचे ठरवले. वडील गेल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची आणि आईची जबाबदारी आली. तीनही बहिणींचे लग्न झाले आहे. त्यांची मुले आणि आई हेच संपुर्ण कुटुंब असून कुटुंबासोबत अत्यंत भावनिक नाते असल्याचे त्या सांगतात.

खासगी काहीच नाही माझे जीवन सार्वजनिकच
भावनाताईंना त्यांच्या खासगी जीवनाविषयी विचारले असता, माझ्या जीवनात खासगी असे काहीही नाही. राजकारण, लोकांचे प्रश्‍न, शेतकऱ्यांच्या समस्या, गरीब, महिला, विद्यार्थी यांच्यामध्ये वावरणे आणि त्यांचे प्रश्‍न सोडवणे यातच आयुष्य खर्ची होत असल्याने, खासगी असे काहीच नाही तर माझे जीवनच सार्वजनिक असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात आईची मोठी शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा आई आपल्याला एकटं सोडून जाईल का ही भिती मनात दाटून आली परंतु, तशाही परिस्थितीत मला आईला वेळ देता आला नसल्याची खंत त्यांच्या मनाला अद्यापही आहे.

घरात कमी वेळ असते
स्वयंपाकघरात मी कधी रमलेच नाही अशी प्रांजळ कबुली भावनाताईंनी दिली. त्यामुळे किचनमध्ये मला काहीही बनवायला सांगितले तर मी बनवू शकणार नाही. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले न केले तोवर राजकीय प्रवेश केला. त्यात इतके गुरफटून गेले की, स्वयंपाकघरात किंवा इतर खासगी गोष्टींना वेळ देताच आला नाही. आणि सार्वजनिक जीवनातच मला आनंद मिळत असल्याने मी अधिक कार्यक्षम राहत असल्याचे त्या सांगतात. खानपानाचीही विशेष आवड नसून, जे समोर आले ते अन्न हे पूर्णब्रह्म समजुन मी खाते. साडीपेक्षा सलवार कमीजमध्ये सोयिस्कर वाटत असल्याने, सलवारलाच प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.

शंकुतला रेल्वेलाईनसाठी भांडले
माझ्या मतदार संघात स्वतंत्र रेल्वेलाईन असावी अशी आग्रही भुमिका घेत, मंत्रीमंडळात शंकुतला रेल्वेलाईनसाठी वाद घातला आणि प्रकल्पाला मंजुरी मिळवलीच. अनेकवेळा मतदारसंघातील कामासाठी भांडावे लागते, मागे लागून कामे करून घ्यावी लागतात. शेतकरी आत्महत्या अधिक असल्याने, शेतकरी कुटुंब, विधवा स्रिया आणि त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे खासदार भावना गवळी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com