
जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, वणी, घाटंजी, नेर, पांढरकवडा या दहा नगरपालिका आहेत. याठिकाणी जानेवारी 2021मध्ये विद्यमान सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नवीन सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपालिकांतील विषय समित्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या जानेवारी 2021मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, कोरोनाचे संकट आल्यापासून ऑफलाइन बैठका बंद आहेत. अशा परिस्थितीत जानेवारीत सभापतींच्या निवडीसाठी बैठकांना परवानगी मिळते की नाही व सभापतींच्या जागा रिक्त राहणार का? याबाबत संभ्रम आहे.
हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही...
जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नगरपंचायती, ग्रामपंचायत यानंतर नगरपालिकांतील विषय समिती सभापतीची निवड होणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्ह्यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, वणी, घाटंजी, नेर, पांढरकवडा या दहा नगरपालिका आहेत. याठिकाणी जानेवारी 2021मध्ये विद्यमान सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नवीन सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र, सध्या कोविड-19मुळे बैठका घेणे बंद आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती आदी ठिकाणी कोणतीही ऑफलाइन बैठक झाली नाही. सभापतींची निवड करताना विशेष सभेचे आयोजन केले जाते. परंतु, कोरोनाच्या काळात बैठक होणार की नाही, याबाबत शक्यता कमीच आहे. दुसरीकडे 2021 हे नगरपालिका निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे सभापतिपदावर आपली वर्णी लागावी, यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशास्थितीत आपल्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडावी, यासाठी नगरसेवकांकडून 'फिल्डिंग' लावली जात आहे.
हेही वाचा -Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
पालिकानिहाय सभापतींची मुदत संपण्याची तारीख -
यवतमाळ : 9 जानेवारी
वणी : 9 जानेवारी
दारव्हा : 16 जानेवारी
दिग्रस : 13 जानेवारी
पुसद : 13 जानेवारी
उमरखेड : 13 जानेवारी
आर्णी : 13 जानेवारी
घाटंजी : 13 जानेवारी
नेर : 17 जानेवारी
पांढरकवडा : 23 जानेवारी
जिल्हा परिषदेतील पद रिक्त -
जिल्हा परिषदेत विषय समिती सदस्य व स्थायी समिती सदस्यांची पदे रिक्त आहेत. कोविड-19 सुरू झाल्यापासून निवडीची विशेष सभा झालेली नाही. त्यामुळे नऊ महिन्यांपासून विषय समितीत जाण्यासाठी पंचायत समिती सभापती व स्थायी समितीत जाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य ताटकळत आहेत.