ओएनजीसीकडून वाशीम जिल्ह्यात खनिज संपत्तीचा शोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

संगणकीय बोअरमशीच्या माध्यमातून माती, खडक व पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत. महिनाभरानंतर नमुन्याचा निष्कर्ष अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

वाशीम - जिल्ह्यामधील गाळाच्या जमिनीवर तसेच खोलगट भागात ऑइल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशन लिमीटेड (ओएनजीसी) च्या वतीने जिल्ह्यात 30 ट्रॅक्‍टरचलीत मशीनच्या माध्यमातून बोअर खोदून गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक वायू व खनिज तेलाचा शोध घेतला जात आहे. या संगणकीय बोअरमशीच्या माध्यमातून माती, खडक व पाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत. महिनाभरानंतर नमुन्याचा निष्कर्ष अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

ओएनजीसीच्या वतीने जिल्ह्यातील खोलगट व गाळाच्या जमिनीत गेल्या आठ दिवसांपासून ट्रॅक्‍टरचलित बोअरमशीनच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कूपनलिका खोदण्यात येत आहेत. 95 फूट खोल व 20 फूट अंतरावर ट्रॅक्‍टरवर असलेल्या मशीन कूपनलिका खोदत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, वनसंरक्षण व उपविभागीय अधिकाऱ्यांना ओनएनजीसीला सहकार्य करण्याचे पत्र पाठविले आहे. ओएनजीसीच्या वतीने अल्फा जिओ इंडिया लिमिटेड हैदराबाद या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. 

अकोला व वाशीम जिल्ह्याचा समावेश 
ओएनजीसीने नैसर्गिक वायू व पेट्रोलियम पदार्थांच्या शोधासाठी अकोला जिल्ह्यातील दुधलम व पातूर वनपरिक्षेत्राची निवड केली आहे. तसेच वाशीम जिल्ह्यामध्ये वाशीम तालुक्‍यातील कळंबा महाली, मानोरा तालुक्‍यातील अरुणावती नदीचा परिसर, रिसोड तालुक्‍यातील पैनगंगा नदीचा परिसर सर्वेक्षणासाठी निवडला आहे. 

टेलीमॅट्रिक केबलच्या सहाय्याने नमुने 
शेतांमध्ये करण्यात येणाऱ्या बोअरचा व्यास 6.6 इंच असून, खोली 95 फुट आहे. 10 चौरस किलोमीटरमध्ये 16 बोअर खोदण्यात येत आहेत. हे बोअर टेलीमॅट्रीक केबलच्या सहाय्याने संगणकाला जोडले गेले आहेत. संगणकाच्या माध्यमातून हे नमुने संकलित केले जात आहेत. अल्फा जिओ कंपनीच्या वतीने 15 दिवसांत हे नमुने ओएनजीसीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

Web Title: ONGC searches for Mineral assets in Washim district