कांदा आणखी रडवणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नागपूर  ः दिवाळीच्या फराळाची चव वाढविणाऱ्या कांद्याची मागणी वाढली आहे. असे असताना परतीच्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने भाववाढ झाली आहे. त्यामुळे पदार्थाची लज्जत हरविणार आहे. सध्या घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांनी वाढल्याने किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रुपये किलोवर पोहोचला आहे. 

नागपूर  ः दिवाळीच्या फराळाची चव वाढविणाऱ्या कांद्याची मागणी वाढली आहे. असे असताना परतीच्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने भाववाढ झाली आहे. त्यामुळे पदार्थाची लज्जत हरविणार आहे. सध्या घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांनी वाढल्याने किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रुपये किलोवर पोहोचला आहे. 
नाशिक, लासलगाव आदी परिसरात कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने आवक कमी झाली. दरम्यान, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात थांबविल्याने भाव स्थिरावले होते. गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने कर्नाटक, आंध्र प्रदेशातील कांदा उत्पादन करणाऱ्या भागात जोरदार हजेरी लावल्याने कांदा खराब झाला. कळमना बाजारात पाच दिवसांपूर्वी 20 ते 22 रुपये किलो असलेला कांदा 30 ते 35 रुपये किलोवर पोहोचला. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात काढणीला आलेल्या 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक कांद्याचे नुकसान झाले. राज्यातील काही भागातून कांदा बाजारात येऊ लागला आहे. नाशिकचा नवीन कांदा येण्यासाठी अद्याप 15 दिवसांचा कालावधी आहे. पावसाच्या फटक्‍यामुळे काद्यांची आवक कमी झालेली असताना दोन्ही राज्यात कांद्याचे उत्पादन घटले. मागणी वाढल्याने भाव कडाडले आहेत. 
उन्हाळ्यात साठवलेला कांदा संपत आहे. भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने वेअर हाऊसमधील कांदा बाहेर काढला. त्यामुळे सरकारकडेही कांदा शिल्लक नाही. आवकही कमी झाल्याने भाववाढ सुरू असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने जुलै महिन्यात कांद्याची निर्यात बंदी केली. अफगाणिस्तान आणि इजिप्तमधून आयात सुरू ठेवली. त्यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात आहेत. निर्यात बंदी केली नसती तर कांदा 100 रुपये किलोवर गेला असता, असे बोलले जाते. 
.... 
पूर्वी दररोज 25 ते 30 ट्रकची आवक व्हायची. ती आता 10 ते 15 ट्रकवर आली आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत आल्याने कांद्याचे भाव वाढले. पावसामुळे नाशिक परिसरातील कांद्याचे नुकसान झाल्याने आवक घटली. त्यामुळे येत्या काही दिवसात काद्यांचे भाव अजून वाढतील. 
अफझल शेख, कांदा व्यापारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The onion will cry even more