सोयाबीन खरेदीसाठी आजपासून शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी, प्रत्यक्षात खरेदी १५ ऑक्टोबरपासून

राजू तंतरपाळे
Thursday, 1 October 2020

कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या दृष्टीने खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.

अमरावती : चालू हंगामातील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची ऑनलाइन नोंदणी उद्या गुरुवार(ता. १)पासून सुरू होणार आहे; तर सोयाबीन खरेदीची प्रत्यक्षात सुरुवात १५ ऑक्‍टोबरपासून होणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची नोंदणी होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे व खरेदी प्रक्रियेच्या दृष्टीने केंद्रावर परिपूर्ण नियोजन व व्यवस्था करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

केंद्र शासनाने प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनसाठी हमीभाव ३ हजार ८८० रुपये, असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या दृष्टीने खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी गुरुवारपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.

जाणून घ्या : बापरे आता हे काय, डोळ्यांतूनही होऊ शकतो कोरोना

मूग व उडीद प्रत्यक्ष खरेदीलाही सुरुवात

जिल्ह्यात मूग व उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. मूग व उडीद प्रत्यक्ष खरेदीलाही सुरुवात करण्यात येत आहे. जिल्ह्यात राज्य पणन महासंघाची धारणी, चांदूररेल्वे, तिवसा व दर्यापूर येथे तर व विदर्भ मार्केटिंग सोसायटीची अमरावती, चांदूरबाजार, वरुड, मोर्शी, अंजनगाव, धामणगाव येथे केंद्रे आहेत, अशी माहिती पणन अधिकारी कल्पना धोपे यांनी दिली.

अवश्य वाचा : अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला ट्रकची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

शेतकऱ्यांनी सातबारा उतारा सादर करावा

ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड, सातबारा उतारा, पीकपेरा, बॅंक पासबुक आदी आवश्‍यक आहे. सर्व खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्‍यातील किंवा जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकरी बांधवांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा, अशी माहिती पणन अधिकारी एस. बी. देशमुख यांनी दिली.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online registration of farmers for soybean purchase from today