शेतकऱ्यांची हमी केंद्राकडे पाठ, यंदा काटा पूजनावरच मानावे लागले समाधान

चेतन देशमुख
Sunday, 1 November 2020

सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील एक हजार 800 शेतकऱ्यांनी आपली नावे नोंदविली आहेत. प्रत्यक्षात खुल्या बाजारात हमी दरापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खासगी बाजारात शेतमालविक्रीला पसंती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल संदेश जाऊनही शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

यवतमाळ : सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात हमी केंद्र सुरू करण्यात आले. खासगी बाजारात सोयाबीनला हमीदरापेक्षा जास्त दर मिळत असल्याने सध्या शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. परिणामी, काटा पूजन करून यंदा हमी केंदांना समाधान मानावे लागले.

हेही वाचा - सोयाबीन तर गेलेच, आता कापसावरही बोंडअळी; यंदा आम्ही जगायचं कसं?

सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील एक हजार 800 शेतकऱ्यांनी आपली नावे नोंदविली आहेत. प्रत्यक्षात खुल्या बाजारात हमी दरापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी खासगी बाजारात शेतमालविक्रीला पसंती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल संदेश जाऊनही शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. हमीदर जास्त असल्याने यंदा केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड उडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने नियोजनदेखील करण्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले.

हेही वाचा - अमरावतीत दोन कोविड सेंटर बंद, कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं कारण तरी काय?

पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शासनाच्या हमी केंद्रांवर तीन हजार 880 रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. त्यातुलनेत खासगी बाजारात सोयाबीनचे दर चार हजार 200 रुपयांपर्यंत गेले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची पसंती खासगी बाजारपेठेला जास्त आहे. सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शासकीय हमी केंद्रांकडून संदेश पाठविण्यात आले. सोयाबीन कुठे घेऊन यायची, याबद्दल माहिती देण्यात आली. मात्र, खासगी बाजारात जास्त दर असल्याने संदेश आल्यानंतरही शेतकऱ्यांनी हमी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, शासकीय केंद्रांवर केवळ काटापूजन झाले. खासगी बाजारात क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपये अधिक आहेत. सोयाबीन विक्री केल्यानंतर तत्काळ पैसेही मिळते. याच कारणांमुळे आता शेतकरी शासकीय केंद्रांऐवजी खासगी बाजाराला पसंती देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 1800 farmers registered for soybean selling in yavatmal