नागपुरात ई-कार अवघ्या पन्नास!

Electric-Car
Electric-Car

नागपूर - देशात २०३० पर्यंत पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या कारऐवजी ई-कार म्हणजे विजेच्या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रिक कार रस्त्यावर आणण्याचे लक्ष भारताने ठेवले असले, तरी मूलभूत सोयींअभावी ई-कारचा वापर अपेक्षित वेगाने वाढत नसल्याचे दिसून आले आहे. नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीचे उदाहरण या संदर्भात बोलके ठरावे. ३० लाखांवर लोकसंख्या असलेल्या या शहरात जेमतेम ५० जणांनी खासगी स्वरूपात ई-कारचा वापर सुरू केला आहे. 

एकुणात सर्वत्र ई-कार्सच्या संदर्भातले चित्र फारसे समाधानकारक नाही. विक्रीच्या तुलनेत या कार्सचा होणारा वापर २५-३० टक्‍क्‍यांच्या वर जाताना दिसत नाही. आरटीओतील सूत्रांच्या माहितीनुसार, उपराजधानीत खासगी व्यक्तींकडे आणाऱ्या ई-कारची संख्या ५०च्या आतच आहे. ‘ओला’ने दीडशे ‘बॅटरी कार’ नागपुरात उपलब्ध करून दिल्या. त्यातील बहुतांशी गाड्या बंदच असल्याची माहिती आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून ई-कारला चालना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित यश येताना दिसत नाही. जाणकारांच्या मते,  ई-कारची किंमत अन्य कारच्या तुलनेत फारच अधिक आहे. करांमध्ये सूट देऊनसुद्धा बॅटरी कार घेणे मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडणारे नाही. 

बिघाड आल्यास मेकॅनिक सहजतेने उपलब्ध नाही. चार्जिंग स्टेशन्स अल्प प्रमाणात आहेत आणि तीसुद्धा प्रामुख्याने शहरात आहेत. बाहेरगावी जायचे असल्यास चार्जिंग स्टेशन मिळेलच याची शाश्‍वती नाही. शिवाय बॅटरी लवकर खराब होत असल्याची धारणा लोकांमध्ये आहे. त्यामुळे संत्रानगरीत ई-कारचा हवा तसा खप नाही.

मूलभूत सोयी अपुऱ्या
अभ्यासकांच्या मते ई-कार्सच्या स्वीकारार्हतेत येणाऱ्या अडचणी सोडवण्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ई-कारसाठी लागणाऱ्या मूलभूत सोयी तातडीने उपलब्ध करून द्यायला हव्यात. हे नवे तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर वाढण्यासाठी उपयोगिता आणि खर्च या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. शिवाय, चांगले रस्ते, पुरेसे चार्जिंग स्टेशन्स आणि बिघाड आल्यास मदत मिळण्यासाठी व्यवस्था हे सारे आधी करावे आणि नंतर लगेच ई-कार घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले पाहिजे, असे जाणकार म्हणतात. नागपुरात विकास कामे सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो तेव्हा या गाड्यांची बॅटरी उतरून जाते. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात अद्यापही या कार्स विश्‍वासार्ह वाटत नाहीत, हीदेखील एक अडचण असल्याचे जाणकार सांगतात.

फक्त सात चार्जिंग पॉइंट
मोठ्या प्रमाणावर चार्जिंग पॉइंट सुरू करण्याची घोषणा ओला कंपनीने केली होती. पण, कंपनीची विमानतळ, श्रीकृष्णनगर चौक, संविधान चौक या तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स आहे. लकडगंजच्या पेट्रोल पंपावर आणि कामठी रोडवरील एका पंपावर चार्जिंग पॉइंट सुरू करण्यात आले. महावितरणने अमरावती मार्गावरील उपकेंद्रात चार्जिंग स्टेशन साकारले आहे.

मोबाईलप्रमाणे ई-कारच्या चार्जिंग पिन्स वेगवेगळ्या धाटणीच्या असतात. प्रामुख्याने भारत प्रोटोकॉल व महिंद्रा प्रोटोकॉल या दोन पद्धतीच्या कार चार्जिंग पिन्स आहेत. ‘ओला’च्या स्टेशनवर महिंद्रा प्रोटोकॉलचे चार्जर उपलब्ध आहे. घरी चार्जिंग करायचे झाल्यास सुमारे सहा तासांचा अवधी लागतो, तर चार्जिंग स्टेशनवर ५० मिनिटे ते दोन तासांत चार्जिंग पूर्ण होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com