esakal | चंद्रपूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्‍टर चार अन् रुग्ण हजार... बहोत नाइन्साफी है ये!
sakal

बोलून बातमी शोधा

chandrapur

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शुक्रवारला प्रशासनाची बैठक घेतली. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, अशी स्थिती आहे.

चंद्रपूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्‍टर चार अन् रुग्ण हजार... बहोत नाइन्साफी है ये!

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत भयावह स्थितीत पोचली आहे. वाढत्या संसर्गाने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णांना तपासण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये डॉक्‍टरांचा तुटवडा आहे. केवळ चार डॉक्‍टरांच्या भरवशावर कोरोना रुग्णांचा उपचार सुरू आहे, अशी कबुली खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शुक्रवारला प्रशासनाची बैठक घेतली. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, अशी स्थिती आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला. यामुळे फायदा होईल असे वाटले. जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये पाच डॉक्‍टरांच्या भरवशावर कोरोनाग्रस्तांचा उपचार सुरू होता. आता यातील एक डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे केवळ चार डॉक्‍टरांच्या भरवशावर हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनुष्यबळ कमी आहे, असे पालकमंत्री म्हणाले. 

मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता बाहेर जिल्ह्यातील डॉक्‍टरांना बोलवावे लागणार आहे. जिल्ह्यातील काही तालुक्ं‍यातील डॉक्‍टरांची सुद्धा यात मदत घेतली जाईल. परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र, येत्या आठ दिवसात ही परिस्थिती बदलेली दिसेल, असा दिलासा त्यांनी दिला. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी कोविड केअर सेंटरमधून ध्वनिक्षेपकावर घोषणांची सोय केली जाईल. कोणते डॉक्‍टर कर्तव्यावर आहे, याचे फलक तिथे लावण्यात येईल, असे वडेट्टीवार म्हणाले. 

अवश्य वाचा- बालगृहाला कंटाळून ती पडली बाहेर अन् रडत बसली रस्त्यावर....वाचा पुढे
 

नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थी मोकळे

येत्या १३ सप्टेंबरला, रविवारी नीटची परीक्षा होऊ घातली आहे. या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना बाहेर जायचे आहे, त्यांना कोणतीही अडवणूक जनता कर्फ्यू दरम्यान केली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर महानगर व बल्लारपूर येथे १० ते १३ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला. याच काळात १३ सप्टेंबरला ‘नीट’ची परीक्षा आली. परीक्षा देता यावी म्हणून पालकांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आणि महापौर राखी कंचर्लावार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. 

अवश्य वाचा- ऐकावे ते नवलच चोरट्यांनी लुटले  चक्क गॅस सिलिंडरचे गोदाम
 

चोवीस तासांत चारशे रुग्ण; पाच मृत्यू 

चंद्रपूर, बल्लारपुरात जनता कर्फ्यू सुरू असतानाच मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली. तब्बल ४०२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि पाच जणांचा मृत्यू झाला. आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन हजार 36 आहे. दरम्यान, चंद्रपुरातील बालाजी वॉर्डातील ४८ वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनीतील ४२ वर्षीय महिला, भद्रावती येथील ५५ वर्षीय पुरुष, बल्लारपुरातील ५६ वर्षीय आणि ब्रह्मपुरीतील ७८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image