पश्‍चिम विदर्भातील आठ धरणांचे उघडले दरवाजे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अमरावती ः पश्‍चिम विदर्भातील मोठ्या नऊ धरणांपैकी अकोल्यातील वान व सात मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या सप्ताहात झालेल्या संततधार पावसाने या आठ धरणांमधील जलसाठा चांगलाच वाढला आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच लाभक्षेत्रातील सिंचनाची अडचण दूर झाली आहे. मात्र, विभागातील काही धरणे अजूनही तहानलेलीच आहेत. विभागात जेमतेम 36 टक्के जलसाठा झाला आहे.

अमरावती ः पश्‍चिम विदर्भातील मोठ्या नऊ धरणांपैकी अकोल्यातील वान व सात मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या सप्ताहात झालेल्या संततधार पावसाने या आठ धरणांमधील जलसाठा चांगलाच वाढला आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच लाभक्षेत्रातील सिंचनाची अडचण दूर झाली आहे. मात्र, विभागातील काही धरणे अजूनही तहानलेलीच आहेत. विभागात जेमतेम 36 टक्के जलसाठा झाला आहे.
उन्हाळ्यात पश्‍चिम विदर्भात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. 42 तालुक्‍यांतील 418 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. पावसाळ्याच्या दिवसांतही काही गावांत टॅंकर सुरू होते. जून व जुलैमध्ये पावसाने अपेक्षित सरासरी गाठली नाही. ऑगस्टमध्ये मात्र पहिल्याच सप्ताहात पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील जलसाठा वाढला. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पातील जलपातळीने मर्यादा गाठल्याने या प्रकल्पाची सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 35.98 घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. अकोट नगर परिषदेसह ग्रामीण पाणीपुरवठा या प्रकल्पावर अवलंबला आहे.
विभागातील सात मध्यम प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत. यापैकी चार प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील आहेत. सापन व शहानूर प्रकल्पाची प्रत्येकी चार दरवाजे उघडले आहेत. त्यातून अनुक्रमे 30.40 व 14.41 घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे, तर पूर्णा व चंद्रभागा प्रकल्पाची प्रत्येकी दोन दरवाजे उघडावी लागली आहेत. त्यातून अनुक्रमे 20 व 8.11 घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. बुलडाण्यातील पलढग हा शून्यावर आलेला प्रकल्प शंभर टक्के भरला असून त्याची दारे चार सेंटिमीटरने उघडण्याची वेळ आली आहे. घुंगशी बॅरेजची सर्व दारे वर उचलण्यात आली आहेत.विभागातील नऊ मोठ्या, 24 मध्यम व 469 लघुप्रकल्पांत 1162 दलघमी जलसाठा झाला आहे.
 
जलसाठा समाधानकारक नाही
काटेपूर्णा, अरुणावती व नळगंगा या मोठ्या धरणांची स्थिती मात्र अजूनही चिंताजनक आहे. काटेपूर्णात 4.19 व नळगंगात 11.86 दलघमी तर अरुणावतीमध्ये 20.39 दलघमी इतकाच साठा आहे. मध्यम प्रकल्पाच्या श्रेणीतील उतावळी, तोरणा, कोराडी, सोनल, मोर्णास निर्गुणा, बोरगाव, वाघाडी, गोकी या धरणांच्या जलसाठ्यात अजूनही समाधानकारक सुधारणा झालेली नाही.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opening gates of eight dams in western Vidarbha