आक्रमक वडेट्टीवार की संयमी पृथ्वीराज चव्हाण? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

विधानसभेतील विरोधी क्षनेते पदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. आक्रमक विजय वडेट्टीवार किंवा संयमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघांमधून एकाची नेतेपदासाठी निवड केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.

नागपूर - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेतील विरोधी क्षनेते पदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. आक्रमक विजय वडेट्टीवार किंवा संयमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघांमधून एकाची नेतेपदासाठी निवड केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. मराठवाड्याचे कार्ड चालल्यास बाळासाहेब थोरात यांचेही नाव शेवटच्या क्षणी समोर येऊ शकते. 

लोकसभेच्या निवडणूक शेवटचा टप्प्याचे मतदान उद्या रविवारी होणार आहे. त्यानंतर लगेच सोमवारी (ता. 20) कॉंग्रेसने नेता निवडण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विखे पाटील यांनी मुलासाठी नगर लोकसभेची जागा मागितली होती. आघाडीत ती राष्ट्रवादीकडे होती. ती देण्यास नकार दिल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुलाच्या प्रचारात सहभागी झाल्याने राधाकृष्ण पाटील यांना विरोधीपक्षनेते पद सोडावे लागले. 

वडेट्टीवार उपनेते आहेत. विदर्भातील दुष्काळग्रस्त समितीचे ते अध्यक्ष आहेत. विरोधकांना अंगावर घेऊन त्यांची कोंडी करण्याची ताकदही त्यांच्यात आहे. चंद्रपूरचे आमदार बाळू धानोरकर यांना शिवसेनेतून त्यांनी कॉंग्रेसमध्ये आणले. शेवटपर्यंत संघर्ष करून लोकसभेचीही उमेदवारी मिळवून दिली. यावरून त्यांची पक्षात ताकद वाढल्याचे दिसून येते. विदर्भाला कॉंग्रेसने कुठलेही महत्त्वाचे पद दिलेले नाही. प्रदेशाध्यक्ष मराठवाड्याचे असल्याने विरोधी पक्षनेतेपद विदर्भाला देऊन प्रादेशिक समतोल साधल्या जाऊ शकतो, असेही मत एका कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केले आहे. 

अनेक जण इच्छुक 
लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेची निवडणूक होणार असल्याने विरोधीपक्षनेते पदासाठी कॉंग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. आतापर्यंत नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यात काही नावांवर चर्चा करण्यात आली. सोमवारी होणारी बैठक निर्णायक मानल्या जात आहे. ज्येष्ठतेचा विचार केल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. सभागृहात आक्रमक नेता असावा अशी मागणी झाल्यास विजय वडेट्टीवार यांचा नंबर लागू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition leader vijay wadettiwar or prithviraj chavan