एमआयडीसीकडे जाण्यासाठी मेट्रोचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर ः वर्धा मार्गावर मेट्रोने प्रवास सुरू झाला असून नागरिकांच्या वेळेची बचत होत आहे. आता लोकमान्यनगर ते बर्डी मेट्रोही पुढील महिन्यात धावण्याची शक्‍यता असून एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

नागपूर ः वर्धा मार्गावर मेट्रोने प्रवास सुरू झाला असून नागरिकांच्या वेळेची बचत होत आहे. आता लोकमान्यनगर ते बर्डी मेट्रोही पुढील महिन्यात धावण्याची शक्‍यता असून एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

एमआयडीसीमध्ये हजारो नागरिक नोकरीसाठी दररोज ये-जा करतात. हजारो विद्यार्थीही महाविद्यालये, शाळेत जातात. हिंगणा मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असल्याने चाकरमाने, विद्यार्थ्यांना लवकरच घरून निघावे लागत आहे. स्वतःच्या वाहनांनीही नागरिक, विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यात अडचण निर्माण होत आहे. मात्र, या मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डीपर्यंत मेट्रो ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून सुभाषनगर व लोकमान्यनगर स्टेशनही तयार झाले आहे. या 11 किमीच्या मार्गावर पुढील महिन्यात मेट्रो धावण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीने मनस्ताप सहन करणाऱ्या नागरिकांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मागील दोन वर्षांपासून लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची उत्सुकताही दोन वर्षांपासून असून आता त्यांना प्रत्यक्ष मेट्रोतून प्रवासाची संधी मिळणार आहे. या मार्गात दहा स्टेशनची कामेही युद्धस्तरावर सुरू आहे. अनेक आव्हानांवर मात करून 11 किमीचा हा मार्ग पूर्ण केला. मेट्रोच्या महाकाय पिलर व आकर्षक स्टेशनाबाबतही नागरिकांत कुतूहल निर्माण झाले आहे. मेट्रोमधील तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे महिलांतही मेट्रो प्रवासाची उत्सुकता आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर या मार्गावरील खासगी वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषणातही घट होईल, असा विश्‍वास महामेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे. लोकमान्यनगरपासून एमआयडीसीतील विविध भागांसाठी फिडर बससेवाही सुरू केली जाणार आहे.

अंबाझरीचे दृश्‍य ठरणार आकर्षण
मेट्रो अंबाझरी तलावाच्या नजीक धावणार आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंबाझरी तलावाचे सौंदर्यही न्याहाळणे शक्‍य होणार आहे. पर्यावरणपूरक वातावरणात मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता यावा, यासाठी याच मार्गावर महामेट्रोने लिटिल वूड तयार केले असून येथे सहा हजार वृक्ष लावण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Option for Metro to go to MIDC