संत्राफळ गळतीने उत्पादक हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरुड तालुक्‍यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस आले. परंतु, या वर्षात आंबिया बहराला गळती व संत्राझाडावर अळ्या यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे.

शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरुड तालुक्‍यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस आले. परंतु, या वर्षात आंबिया बहराला गळती व संत्राझाडावर अळ्या यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे.
यावर्षी उन्हाळ्यात लाखो रुपये खर्च करून संत्राझाडे वाचविण्यासाठी शेंदूरजनाघाट परिसरातील संत्रा उत्पादकांना प्रयत्न करावे लागले. ज्यांच्याकडे पाणी होते, त्यांच्या संत्राबागा व संत्राफळे वाचली. मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी व अतितापमानाने संत्राफळे उन्हाळ्यातच गळाली. जून अखेरपर्यंत 40 अंश तापमान भरपावसाच्या कालावधीत असल्याने संत्राझाडे अक्षरश: सलाइनवर होती. त्यामुळे फळांची पाहिजे तशी वाढ झालेली नाही. जमिनीने बाष्प पकडल्याने झाडांची स्थिती दयनीय होती. पाऊस आला, मात्र दमदार नसल्याने जमिनीत पुरेसा ओलावा नव्हता. त्यामुळे संत्राफळांना गळती लागली. त्यातच फळांवर कडक्‍या सुरू झाला. यात फळे गळणे सुरू झाली. त्यानंतर संत्री पिवळी होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ सुरू झाली. गळतीचे प्रमाण मोठे असून महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही ही गळ आटोक्‍यात येत नसल्याने संत्रा उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे.
शेंदूरजनाघाट परिसरातील काही भागात पाने खाणाऱ्या अळीने संत्राझाडांवर हल्ला चढविला असून मौजा खेडी परिसरात संत्रा झाडांवर प्रचंड प्रमाणात अळ्या दिसून येत आहेत. गळालेला संत्रा व संत्राझाडावरील पाने खाणाऱ्या अळ्या वाढतच असल्याने यावर उपाययोजना सूचवण्याकरिता कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. संत्रा उत्पादन घेणाऱ्या शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, रवाळा, सातनूर, पुसला, मालखेड, वाई, वरुड, धनोडी, मालखेड, जरुड, टेंभूरखेडा, तिवसाघाट, पुसली, गव्हाणकुंड, हातूर्णा परिसरात आंबिया बहाराची गळ सुरू असल्याने नगदी पीक जाण्याच्या भीतीने संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे.

अनुदानावर फवारणी औषध द्यावे
यावर्षी आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळ असून खेडी परिसरात संत्राझाडांवर पाने खाणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला. कृषी विभागाने सर्वेक्षण करून संत्रा उत्पादकांना 100 टक्के अनुदानावर फवारणी औषध द्यावे, याकरिता कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी तसे आदेश द्यावेत, अशी मागणी संत्रा उत्पादक हर्षल फुटाणे व सतीश अकर्ते यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orange farmers in trouble