नागपूरमधील सिमेंट रस्त्यांच्या चौकशीचे आदेश: गडकरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

जनमंच या संस्थेनं या सिमेंटच्या रस्त्यांची पाहणी करत दर्जा चांगला नसल्याची तक्रार केली होती. त्यावरून गडकरींनी या रस्त्यांच्या चौकशीचे आदेश देत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर - नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आहेत. 

जनमंच या संस्थेनं या सिमेंटच्या रस्त्यांची पाहणी करत दर्जा चांगला नसल्याची तक्रार केली होती. त्यावरून गडकरींनी या रस्त्यांच्या चौकशीचे आदेश देत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर शहरात 40 किलोमीटरच्या सिमेंटच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. जे रस्ते तयार झाले त्या रस्त्यांवर सहा महिन्यातच भेगा पडल्यात. सिमेंट रस्त्यांच्या बाजूला असलेल्या ड्रेनेज लाइन पूर्णपणे बुजल्या आहेत. आजूबाजूच्या घरांच्या तुलनेत रस्ते उंच झाल्यामुळे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यांचे पब्लिक ऑडिट करण्याचा निर्णय जनमंच या संस्थेने घेतला होता.

अनेक रस्त्यांची पाहणी केल्यावर हे रस्ते घाईघाईत तयार करण्यात आले असून रस्त्यांचा दर्जा चांगला नसल्याचे गडकरी यांच्या निदर्शनाला आणून दिले. आमचा कुठल्याही व्यक्ती किंवा पक्षाला विरोध नसल्याचे नमूद करत केवळ जनतेच्या पैशाचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने आम्ही ऑडिट केल्याचे त्यांनी गडकरीना सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी जनमंच प्रशासनाला मदतच करत असून, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्नाला साथ द्या, असे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: orders inquiry into cement roads in Nagpur says Nitin Gadkari