अनाथ मुलांनी रुजविलेली पंधरा हजार झाडेच करताहेत त्यांचे संरक्षण

राज इंगळे
शनिवार, 30 मे 2020

कोरोनाच्या संकटात शंकरबाबांच्या 125 अंध, अपंग, दिव्यांग मुलांच्या अनोख्या परिवारासाठी हेच अरण्य आता जगण्याचे साधन बनले आहे. कारण या वज्झरच्या अनाथाश्रमात आहेत कडुनिंब, साग, आवळा, सीताफळ, चिक्कू, करवंद, लिंबू, तेंदू, रक्तचंदन, लवंग, विलायची आदी फळे देणारी झाडे.

अचलपूर (जि.अमरावती) : जन्मापासूनच अंधारयात्रेत भरकटलेल्या अंध, अपंग, मतिमंद बालकांचे पालकत्व स्वीकारून त्या मुलामुलींच्या हाताने शंकरबाबांनी सातपुड्याच्या पायथ्याशी नंदनवन साकारले, हे ऐकून आपण थक्क व्हाल. या मुलांनी पंधरा हजार झाडांचे अरण्य सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी साकारले आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर या अनाथांच्या नाथाने तसेच त्या मुलांनी ही किमया करून दाखविली. परतवाडा येथून अवघ्या सहा-सात किलोमीटरवर असलेल्या वज्झर येथे 125 अनाथ बालकांनी ही अशक्‍यप्राय बाब शक्‍य करून दाखविली आहे. सध्या हीच झाडे कोरोनाच्या संकटात अनाथाश्रमातील मुलांसाठी आरोग्याचे साधन बनले आहेत.
कोरोनाच्या संकटात शंकरबाबांच्या 125 अंध, अपंग, दिव्यांग मुलांच्या अनोख्या परिवारासाठी हेच अरण्य आता जगण्याचे साधन बनले आहे. कारण या वज्झरच्या अनाथाश्रमात आहेत कडुनिंब, साग, आवळा, सीताफळ, चिक्कू, करवंद, लिंबू, तेंदू, रक्तचंदन, लवंग, विलायची आदी फळे देणारी झाडे. सोबतच अनेक वनौषधीयुक्त झाडेही आहेत. यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास सहा-सात वर्षांपूर्वी बाबांनी विशिष्ट प्रकारच्या गोंदाचे उत्पादन देणाऱ्या कढई प्रजातीची शेकडो झाडे लावली आहेत. या झाडांचा गोंद बाजारात दहा हजार रुपये किलोने विकला जातो. विशेष म्हणजे हा गोंद गर्भवती महिलांच्या सुदृढ आरोग्याकरिता अत्यंत उपयुक्त असल्याचे मानले जाते. सध्या या झाडाला कमी गोंद येतो. मोठ्या प्रमाणात गोंद येणे सुरू झाले की दरवर्षी गोंदविक्री करण्यात येईल. सध्या या अनाथाश्रमातील लहान-मोठ्या वृक्षांची संपूर्ण निगा आश्रमातील ही मूकबधीर मुले राखतात. त्याकरिता प्रत्येक मुलाच्या नावाने झाड वाटून देण्यात आले आहे. पाणी टाकण्याच्या डबक्‍यांवरसुद्धा या बालकांची नावे टाकली असून ते स्वत:च्या नावाची डबकी उचलून ती पाण्याने भरून झाडांना पाणी घालतात. दररोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास असे रोज सहा तास ही बालके येथील वृक्षांची निगा राखतात. ही झाडेच आपला परिवार असून तीच आपल्यावर मायेचा हात फिरवतात, हे या मुलांच्या मनावर बाबांनी बिंबवले आहे. त्यामुळे या मुलांना येथील वृक्षराजीचा आणि त्यावर किलबिलाट करणाऱ्या पाखरांचा लळा लागला आहे. ही झाडे जगली तर चार पैसे मिळून 125 जणांच्या परिवाराचा गाडा चालेल हे वास्तव या मुलांना कळून चुकले आहे. या कुटुंबाच्या अथक परिश्रमातून 265 प्रजातींच्या पंधरा हजार झाडांचं वज्झरचं अरण्य पर्यावरण समतोलातही अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. शंकरबाबांवर जिवापाड प्रेम करणारी ही मतिमंद, अंध, अपंग मुले आज स्वत: निर्माण केलेल्या अरण्याच्या प्रेमात पडली आहेत. दहा-बारा वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांचे आज मोठे वृक्ष झाले असून वन उभे झाले आहे. त्यामुळे आता ही झाडे अनाथाश्रमाच्या उत्पन्नासोबत जगण्याचे एक साधनही बनले आहे. सर्वांच्या मेहनतीने वाढलेल्या जंगलाचा त्यांना जिव्हाळा वाटू लागला आहे, याच वृक्षराजीत शंकरबाबा आपल्या चंद्रमोळी झोपडीत राहतात. कोरोनाच्या संकटातही बाबांनी सर्व येथील झाडांच्या सुकलेल्या पानांचा धूर करून आयुर्वेदिक सॅनिटायझर बनवून या मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात आश्रमातील अंध, अपंग मुले सुखरूप असून हीच विविध प्रजातींची पंधरा हजार झाडे अनाथाश्रमातील मुलांसाठी आरोग्याचे साधन बनली आहेत.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित
झाडांमुळे मुले सुरक्षित
संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात सापडला आहे. अशातच या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक होते, त्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ लिंबाच्या पाल्याचा धूर करून व सॅनिटायझर म्हणून 20 किलो लिंबाच्या पाल्यापासून आयुर्वेदिक सॅनिटायझर तयार केले. याच सॅनिटायझरने व दररोज दोन्ही वेळा धूर करून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे. त्यामुळे आज मुले सुरक्षित आहेत.
शंकरबाबा पापळकर, वज्झर.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orphan boyes made a forest by growing 15 thousand trees