धारणीत रक्तदानाचा ‘रेकॉर्डब्रेक’; महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापन दिनानिमित्त सातशे जणांचे रक्तदान

प्रतिक मालवीय 
Friday, 8 January 2021

धारणी पोलिस स्टेशनमध्ये मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्‌घाटन सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, पोलिस अधीक्षक हरी बालाजी, आयपीएस निकेतन कदम व मेळघाटातील नागरिकांच्या उपस्थित पार पडले.

धारणी (जि. अमरावती ः महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापन दिनानिमित्त धारणी पोलिस पाटील संघटना सेवा प्रतिष्ठान व धारणी शहरातील नागरिकांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबिरात आज, शुक्रवारी मेळघाटातील रक्तदानाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. या शिबिरात तब्बल ७०१ जणांनी रक्तदान केले.

धारणी पोलिस स्टेशनमध्ये मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्‌घाटन सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, पोलिस अधीक्षक हरी बालाजी, आयपीएस निकेतन कदम व मेळघाटातील नागरिकांच्या उपस्थित पार पडले. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरासाठी धारणी पोलिसांनी पंधरा दिवसांपासून तयारी केली होती. 

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

लोकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावोगावी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. पोलिस पाटील संघटनेनेही या रक्तदान शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली. प्रत्येक गावातून रक्तदानासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यामुळे रक्तदान करण्याकरिता शेकडो लोकांनी येथे गर्दी केली. रक्तदानासाठी ‘वेटिंग’ करण्याची वेळ धारणी रंगभवन मैदानात आली होती. रक्तदान शिबिरात प्रत्येक विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षकांनी रक्तदान केले.

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

तहसीलदार अतुल पटोले, नायब तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी सहपरिवार रक्तदान केले. यावेळी एचडीपीओ काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, न.प. सीईओ सुधाकर पानझाडे यांनीही भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी आयपीएस निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात गीते, भोयर, माया वैश्‍य, मालपुरे, अनिल झारेकर, अनुराग पाल, सचिन होले तसेच धारणी पोलिस स्टेशनमधील कर्मचारी, अधिकारी, सेवा प्रतिष्ठान व पोलिस पाटील संघटनेने विशेष प्रयत्न केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 700 Plus People in Dharani donated Blood in Amravati district