
यवतमाळ जिल्ह्यातही पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्ष्यांसह मोर व कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी येथे कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने सदर गाव ऍलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे
यवतमाळ : परराज्यांत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातही कुक्कुट पक्षांसह कावळे, मोरांचा मृत्यू झाला. "बर्ड फ्लू'ची एंट्री झाल्याची भीती जनमाणसांत पसरली आहे. "बर्ड फ्लू'ने पोल्ट्री उद्योगाभोवतीचे संकट अधिकच गडद झालेले दिसून येत आहे. चिकनचे भावही गडगडले आहेत. कोरोना काळातून व्यावसायिक सावरत नाहीत, तोच वर्षभरात हा आता दुसरा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसलेला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्ष्यांसह मोर व कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी येथे कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने सदर गाव ऍलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. येथील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. नोकरी नसल्याने बॅंकांकडून कर्ज काढून सुशिक्षित तरुणांनीही हा व्यवसाय थाटला आहे. मात्र, या व्यवसायावर "बर्ड फ्लू'चे संकट नेहमीच घोंघावत राहते.
नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'
गेल्या वर्षी कोरोना काळातच बर्ड फ्ल्यूची आवई उठली होती. होळीचा सीझन कॅश करण्यासाठी व्यावसायिकांनी फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात बॅचेस टाकलेल्या होत्या. त्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च करून पक्ष्यांचे वजन वाढविले. विक्रीची वेळ येताच कोरोना व बर्ड फ्ल्यूमुळे कुक्कुट पक्ष्यांना खड्डे करून जमिनीत पुरण्याची वेळ आलेली होती. कुक्कुट व्यावसायिकांनी शासनाकडे आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली होती. मात्र, कुणाच्याही हातात मदत पडली नाही.
लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच कर्ज काढून व्यावसायिकांनी बॅचेस टाकून तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला. एक, दोन बॅचेस विक्रीसाठी निघत नाहीत, तोच पुन्हा बर्ड फ्ल्यूचे संकट उभे ठाकले आहे. नागरिकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरविली आहे. दोनशे रुपये प्रतिकिलो ठोकचे भाव 160 रुपयांवर गडगडले आहेत. तर, चिल्लर विक्रीतील 240 रुपयांचे भाव 160 ते 240 रुपयांवर आलेले आहेत. आगामी काही दिवसांत पुन्हा चिकनचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोट्यवधींचा फटका
यवतमाळ जिल्ह्यात लहान-मोठे असे सर्व मिळून चारशेच्या घरात पोल्टी फार्म आहेत. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी व्यावसायिकांनी बर्डस टाकले. मात्र, हातात काही रक्कम पडण्यापूर्वीच बर्ड फ्ल्यूमुळे विक्री योग्य झालेले पक्षी फार्ममध्येच आहेत. भाव कमी होत आहेत. नागरिकांनीही चिकनकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.
पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी येथील मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. येत्या सोमवारपर्यंत अहवाल येऊ शकतो. सध्या तरी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला, असे म्हणता येणार नाही. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
-डॉ. राजीव खेरडे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.
संपादन - अथर्व महांकाळ