"ऊर्जामंत्री चार्टर्ड फ्लाईटवर कोट्यवधी उडवतात अन् वीजबिल माफीवर यु टर्न का?" भाजप प्रभारींचा सवाल 

टीम ई सकाळ 
Friday, 15 January 2021

ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी अनेक वेळा मुंबई-नागपूर चार्टर्ड प्लेनने प्रवास केला आहे. चार्टर्ड प्लेनची बिले महावितरण आणि महारापारेषण यांच्याकडून भरण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता चार्टर्ड प्लेन ऊर्जामंत्र्यांनी वापरले.

नागपूर ः राज्यातील गरीब जनतेने कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अवाजवी वीज बिल माफीची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षानं कित्येकदा १०० युनिट वीजबिल माफी देण्याची मागणी केली. पण ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आणि सरकारने ब्र सुद्धा काढला नाही. मात्र स्वतःच्या बंगल्यावर आणि चार्टर्ड फ्लाईटवर कोट्यवधी रुपयांचा खर्च कसा करता, असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाचे मिडिया प्रभारी विश्‍वास पाठक यांनी केला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी अनेक वेळा मुंबई-नागपूर चार्टर्ड प्लेनने प्रवास केला आहे. चार्टर्ड प्लेनची बिले महावितरण आणि महारापारेषण यांच्याकडून भरण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता चार्टर्ड प्लेन ऊर्जामंत्र्यांनी वापरले. त्यावर सुद्धा काही कार्यवाही झालेली नाही. स्वतःच्या बंगल्यावर, मंत्रालयातील कार्यालयावर आणि चार्टर्ड फ्लाईटवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात, मात्र वीज बिल माफीवर यु टर्न घेतात, ही राज्यातील जनतेची फसवणूक असल्याचा आरोप विश्‍वास पाठक यांनी केला.

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

काय म्हणाले विश्वास पाठक 

पाठक म्हणाले, मुंबई अंधारात गेली होती, त्या घटनेला आता तीन महिने झाले. कारवाई तर दुरच पण चौकशीचा अहवालही अद्याप आलेला नाही. त्यामुळे ऊर्जामंत्री आणि सरकार काम करते की नाही, असा प्रश्‍न साहजिकच पडतो. वाढीव वीज बिलापाई जनता त्रस्त झाली. 

वाढीव वीज बिलामुळे आत्महत्यासुद्धा झालेली आहे. तरीही सरकारमधील मंत्र्यांना पाझर फुटत नाही. आधी ऊर्जामंत्रीच वीज बिल माफीची घोषणा करतात, नंतर यु टर्न घेतात. तो त्यांच्या नाकर्तेपणामुळे की सरकारमध्ये त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून, हे सुद्धा कळायला मार्ग नाही.

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

ऊर्जा खात्याच्या महाजेनको निर्मित संचालक पद रिक्त आहे. मात्र त्या ठिकाणी ऊर्जामंत्र्यांचे लक्ष नाही. स्वतःच्या सुखसोयी आणि आरामावर कोट्यवधी खर्च करायचे आणि जनतेसाठी काही करायचे असले की हात वर करायचे, असे एकंदरीत ऊर्जामंत्र्यांचे काम असल्याचा घणाघातही पाठक यांनी केला.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Media front Leader Vishwas Pathak Criticized Nitin Raut