
'राघववेळ' या कादंबरीसाठी १९९५ मध्ये साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. नामदेव चंद्रभान कांबळे हे वाशीमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते.
नागपूर : 'राघववेळ' आणि त्यानंतरच्या लिखाणात गावकुसाबाहेरील स्त्रियांची वेदना मांडणारे विदर्भातील नामवंत लेखक, कादंबरीकार नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांचा जन्म मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे १ जानेवारी १९४८ ला शेतमजूर कुटुंबात झाला. कठीण परिस्थितून शिक्षण घेत त्यांनी बारावीनंतर एमबीबीएसला प्रवेश घेतला. मात्र, प्रथम वर्षातच अपयश आल्याच्या नैराश्येतून ते साहित्य क्षेत्राकडे वळले आणि आज पद्मश्री पुरस्कारापर्यंत झेप घेतली.
हेही वाचा - कालव्यात दिसला कुत्रासदृश्य प्राणी, जवळ जावून बघताच उडाली भंबेरी
'राघववेळ' या कादंबरीसाठी १९९५ मध्ये साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. नामदेव चंद्रभान कांबळे हे वाशीमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते. विशेष म्हणजे कांबळे यांनी याच शाळेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी सुरू केली. नोकरी करतानाच शिक्षण पूर्ण करून तेथेच ते शिक्षक म्हणून रुजू झाले. वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (ता. मालेगाव) येथील एका शेतमजुराच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांची पहिली कादंबरी 'अस्पर्श' ही होती. तर दुसरी कादंबरी 'राघववेळ' ही होती. या व्यतिरिक्त 'ऊनसावली', 'सांजरंग'यासह आठ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, दोन ललित लेखसंग्रह, एक समीक्षा, एक भाषण संग्रह, एक चरित्र लेख आणि दोन वैचारिक लेख एवढे साहित्य त्यांच्या नावावर आहे. त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी बालभारतीचे अध्यक्षपद व दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या सदस्यपद भूषविले आहे.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
हा साहित्यसेवाचा सन्मान -
मला जाहीर झालेला पद्मश्री सन्मान हा आतापर्यंत केलेल्या साहित्यसेवेचा सन्मान होय. राघववेळ, ऊनसावली आणि सांजरंग या तिन्ही कादंबऱ्यांमधून गावकुसाबाहेरील स्त्रिची वेदना मांडली. स्त्रीप्रधान साहित्यात मुख्यत्वे दलित साहित्यात हा प्रयोग नवीन होता. तत्कालीन गांधी-आंबेडकरी साहित्यात जो संघर्ष होता तो मी समेटाच्या पातळीवर रेखाटण्याचा प्रयत्न केला. आजवर स्पर्श न झालेल्या अनेक विषयांवर लेखन केले. पद्मश्री पुरस्कार हा त्याची पावती आहे असे मी मानतो.
- नामदेव चं. कांबळे, वाशीम.
संपादन - भाग्यश्री राऊत