esakal | बघितली का कोणी, झाडगावची रंगीबेरंगी चित्रमय शाळा
sakal

बोलून बातमी शोधा

kumbholi final

साकोली तालुक्‍यातील झाडगाव जि. प. डिजिटल शाळा मात्र, याला अपवाद ठरली आहे. लॉकडाउनच्या काळात येथील शिक्षकांनी स्वत: मेहनत घेऊन रंगरंगोटी करीत शाळेचा कायापालट केला.

बघितली का कोणी, झाडगावची रंगीबेरंगी चित्रमय शाळा

sakal_logo
By
मेदन लांडगे

झाडगाव (जि.भंडारा) : मुलांना शाळा आणि अभ्यास आवडावा, यासाठी विविध प्रयोग नेहमीच राबविले जातात. टागोरांचे शांतिनिकेतन हे त्याचे उत्तम उदाहरण. मात्र अशी उदाहरणे अपवादानेच आढळतात. एरवी ठरावीक साचाची शाळा आणि ठरावीक साच्याची अभ्यास पद्धती. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा ही नावडतीच असते. खरेतर शाळा ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाचे व संस्काराचे केंद्र. येथील वातावरण प्रसन्न व चित्तवेधक व आनंददायी असणे अपरिहार्य आहे. परंतु, प्रत्यक्षात चित्र दिसते ते विपरीतच. रंग उडालेल्या व भेगाळलेल्या भिंती, मोडके व गळणारे छत अशी एकंदरीत परिस्थिती ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची असते. पण, साकोली तालुक्‍यातील झाडगाव जि. प. डिजिटल शाळा मात्र, याला अपवाद ठरली आहे. लॉकडाउनच्या काळात येथील शिक्षकांनी स्वत: मेहनत घेऊन रंगरंगोटी करीत शाळेचा कायापालट केला.
ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही, जसा माऊली बाळा, हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी, हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी, आम्हास आमुचे गुरुजन शिक्षण देती ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्र. क. अत्रे(केशवकुमार) यांच्या माझी शाळा कवितेतील या ओळींचा शब्द न शब्द प्रत्यक्षात खरा ठरावा यासाठी येथील शिक्षक स्वत: मेहनत व परिश्रम घेत आहेत. एरवी जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता किंबहुना गलेलठ्ठ वेतन घेऊनही आपल्या सेवेशी एकनिष्ठ नसणाऱ्या शिक्षकांबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, ही शाळा व येथील शिक्षकही विरळाच. गेल्या 22 मार्चपासून देशात कोरोनाच्या महामारीच्या पाश्वभूमीवर टाळेबंदीमुळे शाळांना कुलूपे आहेत. इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनीसुद्धा घरी बसूनच कामे केली. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शिथिलता मिळूनही काहींनी कर्तव्यापासून पाठ फिरविली. तर काही संस्थात्मक विलगीकरण केंद्रावर सध्या सक्तीमुळे नाइलाजाने हजेरी लावत आहेत. परंतु, लॉकडाउनमध्ये मिळालेला वेळ सत्कारणी लावत जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल झाडगाव येथील मुख्याध्यापक काशिनाथ राऊत आणि सहाय्यक शिक्षक राम चाचेरे यांनी स्वखर्चातून आकर्षक असे रंगकाम करून शाळेचे रुपडे पालटले आहे. यात शाळासमितीचे अध्यक्ष विश्वनाथ वालोदे, देवानंद काशिकर, शुभम हेमने, शरद चाचेरे, हुकेश वालोदे यांनीसुद्धा पूर्ण वेळ देत सहकार्य केले.
शाळा झाली चित्रमय
शाळेचे रंगकाम करताना देशभक्तीसह कला, सांस्कृतिक, क्रीडा, श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण, स्वछता, राष्ट्रीय एकात्मता दर्शविणारे भित्तिचित्र साकारले आहेत. त्याबरोबरच अभ्यासाशी निगडित, धूम्रपान व दारू बंदी, कोरोना जनजागृती सारखी प्रबोधनपर चित्रे आहेत. भिंतीवर चितारलेले शिवचरित्र विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे आहे. अत्यंत खुबीने व हातोटीने साकारण्यात आलेल्या या आकर्षक चित्रांची निर्मिती शिक्षकांनी आपल्या कल्पनेतून आणि पालकांच्या सहकार्यातून केली आहे. एखाद्या व्यावसायिक कलाकारालाही बाजूला सारेल अशा या कलाकृतींनी शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे.
गुणवत्तेतही आघाडीवर
25 पटसंख्या असलेल्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. शाळेचे फक्त बाह्यरूपच देखणे नसून शिक्षण व गुणवत्तेतही ही शाळा आघाडीवर आहे. या दोन शिक्षकी शाळेत वर्षभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. शिक्षणाचा दर्जाही उत्तम असल्याने इंग्लिश कॉन्व्हेंट सोडून विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. गेल्यावर्षी सानगडी येथील 4 तर यंदा दुपटीने विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे युनेस्को क्‍लब असलेली ही जिल्ह्यातील पहिली शाळा आहे.

सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना

वेळेचा सदुपयोग
लॉकडाउनच्या काळात गावातील पालकांनाही वेळ होता. या वेळेचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने मी आणि माझ्या सहकारी शिक्षकांनी शाळेचे रंगकाम करायचे ठरवले. आम्ही रोज पहाटेच शाळेत येऊन सायंकाळपर्यंत सामाजिक दुरीकरणाचे पालन करून रंगकाम केले. चित्र काढून शाळेचा परिसर सुशोभित केला. यात पालकांचेही सहकार्य लाभले.
काशिनाथ राऊत
मुख्याध्यापक, जि. प. डिजिटल शाळा, झाडगाव