शेतकऱ्यांनो! कापूस विकायचा असल्यास लगेच घराबाहेर पडा, 'या' तारखेला पणनचे केंद्र होणार बंद

panan cotton selling center will closed at 16 february in yavatmal
panan cotton selling center will closed at 16 february in yavatmal

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जिल्ह्यातील पाच केंद्रावर कापूस खरेदी सुरू केली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी संपली आहे. सोमवारी (ता.15) पर्यंत पणनचे केंद्र सुरू राहणार असून मंगळवार (ता.16) पासून पणनचे केंद्रे बंद राहणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यंदा दिवाळीनंतर जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, कळंब व आर्णी असे केवळ तीन केंद्रे उघडण्यात आले. त्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. याठिकाणी जवळपास एक लाख क्विंटल कापसाची नोंदणी शेतकऱ्यांनी केली होती. केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची गर्दी पाहता दुसऱ्या टप्प्यात महागाव तसेच पुसद हे दोन केंद्रे सुरू करण्यात आले. खासगी बाजारात कापसाला कमीभाव असल्याने शेतकऱ्यांची पसंती पणनच्या केंद्रांना होती. यंदा पणन महासंघाने जिल्ह्यात चार लाख 33 हजार 652 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. पाच केंद्रातील 14 जिनिंगवर 17 हजार 96 शेतकऱ्यांनी 248 कोटी 27 लाख रुपयांचा कापूस विकला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पणनकडे मोठ्या प्रमाणात कापूस आला आहे. शेतकऱ्यांच्या घरातील शेवटचे बोंड खरेदी करेपर्यंत केंद्र बंद करणार नसल्याचे पणनने सांगितले होते. मात्र, यंदा आधीच पणनने केंद्र बंद करण्याची घोषणा केली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक आहे. पणनचे केंद्र बंद झाल्यास खासगी बाजारात भाव पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता पणन महासंघ केंद्र सुरू ठेवण्याबाबत फेरविचार करणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

साडेसोळा कोटी थकीत -
यंदा पणन महासंघाने 17 हजार 96 शेतकऱ्यांकडून 248 कोटी 27 लाख रुपयांची कापूस खरेदी केली आहे. यातील 15 हजार 903 शेतकऱ्यांना 231 कोटी 82 लाख रुपयांचे पेमेंट दिले आहे. अजूनही एक हजार 193 शेतकऱ्यांचे 16 कोटी 45 लाख रुपयांचे पेमेंट पणनकडे शिल्लक आहेत.

सध्या केंद्रावर कापसाची आवक वाढली आहे. मात्र, पणनचे केंद्र बंद झाल्यास भाव पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. केंद्र बंद करण्याबाबत व्यवस्थापकाकडून सूचना आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची मागणी झाल्यास केंद्र सुरू ठेवण्याबाबत पाठपुरावा करू. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ.
-सुरेश चिंचोळकर, संचालक, पणन महासंघ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com