शेतकऱ्यांनो! आता घरूनच करता येईल कापूस विक्रीसाठी नोंदणी, फक्त करा एक क्लिक

चेतन देशमुख
Saturday, 23 January 2021

'पणन'च्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना कापूसविक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना संबंधित केंद्रांवर जावे लागते. शिवाय, त्याठिकाणी तासन्‌तास उभे राहून नोंदणी करावी लागते

यवतमाळ : आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात अनेक बदल झपाट्याने होत आहेत. अत्याधुनिक मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. त्याचा वापर आता पणन महासंघाने करण्याचा निर्णय घेतला आहे. हमीभाव केंद्रांवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक किलोमीटरच्या प्रवासासह रांगेत लागण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. पणन महासंघाने 'कॉटन फार्मर एसआरएस' हे अ‌ॅप तयार केले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना घरूनच हमीभाव दराने कापूस विक्रीसाठी यापुढे नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

'पणन'च्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना कापूसविक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना संबंधित केंद्रांवर जावे लागते. शिवाय, त्याठिकाणी तासन्‌तास उभे राहून नोंदणी करावी लागते. त्यात वेळ वाया जातो. शिवाय, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. या लांबलचक व किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातून शेतकऱ्यांची सुधारणा करण्यासाठी काळानुरूप पणन महासंघाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी पणन महासंघाने 'कॉटन फार्मर एसआरएस' हे नवे अ‌ॅप तयार केले आहे. अ‌ॅन्ड्राइड स्मार्ट फोनवर हे अ‌ॅप डाऊनलोड करून त्यातून शेतकऱ्यांना घरबसल्या कुठेही न जाता नावनोंदणी करता येणार आहे. अ‌ॅपवर शेतकऱ्यांना शेतीविषयक व बँकेच्या तपशिलाची माहिती भरून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी 'अ‌ॅप'वर दिलेल्या माहितीच्या आधारे बाजार समिती शासकीय दस्तऐवज तपासून नोंदणीची कारवाई अंतिम करणार आहे. या अ‌ॅपमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजार समितीत जाणे, त्याठिकाणी कागदपत्रे घेऊन नोंदणी करणे अशा अनेक बाबींतून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

केवळ एका क्‍लिकवर शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांवर कापूसविक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. पणन महासंघाने अ‌ॅपचा प्रस्ताव शासनाला मान्यतेसाठी पाठविला होता. राज्य शासनाने याला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्‍यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अ‌ॅपद्वारे नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीत पूर्वीप्रमाणे ऑफलाइन नोंदणी करता येणार आहे. नागपूर ग्रामीणमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर लवकरच इतर जिल्ह्यांतही याच पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, शेतकऱ्यांना घरी बसूनच शासकीय हमीदर केंद्रांवर नाव नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा -

शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता आम्ही हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल. सध्या प्रायोगिक तत्वावर प्रकल्प आहे. त्यानंतर सर्वच ठिकाणी अ‌ॅप उपलब्ध होणार आहेत. अ‌ॅपमध्ये काही अडचणी आल्यास ऑफलाइन नोंदणीही शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीत करता येणार आहे.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panan mahasangh application for cotton registration in yavatmal