esakal | 'पणन' केंद्रांचा मुहूर्त लवकरच, यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांसह पणन मंत्र्यांशी चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

panan mahasangh cotton selling center will starts soon in yavatmal

अमरावती विभाग हे प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशात येते. गेल्या हंगामातही मोठ्या प्रमाणात पणन व 'सीसीआय'च्या केंद्रांवर कापसाची खरेदी झाली. नागपूर विभागातही मोठ्या प्रमाणात कापूस पीक घेतले जात आहे. 

'पणन' केंद्रांचा मुहूर्त लवकरच, यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांसह पणन मंत्र्यांशी चर्चा

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : राज्यात दरवर्षी पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होते. यंदा दिवाळीनंतरही केंद्र सुरू झाले नाही. पणन महासंघाने खरेदीसाठी तयारी पूर्ण केली असली तरी शासनाकडून अद्याप ग्रीन सिग्नल आलेला नाही. त्यामुळे पणन अध्यक्ष, संचालक तसेच मुंबई बाजार समितीच्या संचालकांनी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर  गुरुवारी (ता.19) मुख्यमंत्री तसेच पणन मंत्र्यांची भेट घेणार असून या बैठकीत पणनचा मुहूर्त ठरण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा -भाऊबीजेच्याच दिवशी भावाला अखेरचा निरोप, हुतात्मा जवान भूषण सतईंच्या बहिणीचा टाहो

अमरावती विभाग हे प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशात येते. गेल्या हंगामातही मोठ्या प्रमाणात पणन व 'सीसीआय'च्या केंद्रांवर कापसाची खरेदी झाली. नागपूर विभागातही मोठ्या प्रमाणात कापूस पीक घेतले जात आहे. पुरामुळे नागपूर विभागातील कपाशीला काही प्रमाणात फटका बसला आहे. परतीच्या पावसाने कपाशी व सोयाबीनला फटका बसला आहे. अशातच आता पणनचे केंद्र अर्ध्यावर आल्याने येत्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी, दिवाळीपूर्वी शासकीय खरेदी केंद्र सुरू होते. यंदा अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. पणन महासंघाचे नियोजन आघाडीवर आहेत. जिनिंग मालकाकडून निविदा मागविण्यात आल्या असून करार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. असे असले तरी शासनाकडून वेळ निश्‍चित न झाल्याने मुहूर्त ठरलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. पणन केंद्र सुरू करण्यासंदर्भात तसेच पणनच्या अडीअडचणी, निसर्ग, चक्रीवादळात कापसाचे झालेल्या नुकसानामुळे जिनिंगवर रिकव्हरी काढण्यात आली आहे. या अडचणींबाबत पणनचे अध्यक्ष अनंत देशमुख, संचालक सुरेश चिंचोळकर, मुबंई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख यांनी नुकतीच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतली.

हेही वाचा - 'एम्स’मध्ये सुरू झाले हृदयावर उपचार; तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पणनमंत्री यांची भेटीची वेळ घेतली आहे. गुरुवारी (ता.19) शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. या भेटीत केंद्र सुरू करण्यासंदर्भात मुहूर्त ठरण्याची शक्‍यता आहे. कापूस खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असली तरी केंद्र उघडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. गेल्या वर्षी 'पणन'च्या केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. जिनिंग प्रेसिंगची संख्याही वाढली. त्यात पावसाचे आगमन झाल्याने गोंधळ उडाला. आधीच मनुष्यबळ कमी असल्याने कामकाज चालविताना पणन महासंघाला अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा आधीच संचालक मंडळाने राज्यात 30 केंद्र उघडण्याचा ठराव घेतला आहे. पणनच्या केंद्रांची संख्या घटल्याने काही ठिकाणी अडचणी येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री, पणनमंत्र्यांची आम्ही भेट घेणार आहोत. याशिवाय, कमी केंद्रांअभावी आठ तालुक्‍यातील शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता संबंधित बाजार समितीचे सभापती, सचिव यांची भेट घेऊन नियोजन केले जाणार आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
-सुरेश चिंचोळकर, संचालक, पणन महासंघ, यवतमाळ.