पंजू तोतवानींच्या मुलाची हायकोर्टात धाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर - पोलिस कस्टडीत असताना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणारी फौजदारी रिट याचिका शिवसेनेचा पदाधिकारी पंजू तोतवानींचा मुलगा राहुल याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. याप्रकरणी बुधवारी (ता. 22) न्यायालयाने गृह विभागाचे सचिव, पोलिस आयुक्त आणि हुडकेश्‍वर पोलिस स्टेशन अधिकारी यांना नोटीस बजावत आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. 

राहुल तोतवानी आणि त्याचे दोन मित्र 10 जानेवारी 2017 रोजी हुडकेश्‍वर येथे मित्राला सोडण्यासाठी टाटा सफारी कारने जात होते. दरम्यान, तुकडोजी चौक ते मानेवाडा चौकातील बेलसरे यांच्या दवाखान्याजवळ गाडीच्या एका चाकाचा टायर फुटला. यामुळे गाडीवर नियंत्रण सुटले आणि गाडी विजेच्या खांबावर आदळली. याची माहिती मिळताच हुडकेश्‍वर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण आवटे घटनास्थळी पोहोचले. यावेळी आवटेंसोबत राहुल आणि त्याच्या मित्रांची शाब्दिक चकमक झाली. राहुलने त्याचे वडील शिवसेनेचे नेते असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी भांडण केल्याचा आरोप याचिकेत केला. तसेच यानंतर पोलिस कस्टडीमध्ये असताना राहुलला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्याच्या शरीरावरील जखमेचे व्रण गंभीर असल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट होत असल्याचा दावा याचिकेत आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक फसविल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यामुळे या प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडी चौकशी करण्यात यावी, नुकसानभरपाई देण्यात यावी, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने राज्य सरकारला एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सी. एच. शर्मा आणि ऍड. प्रतीक शर्मा यांनी बाजू मांडली. 

Web Title: Panju totavani child go to High Court