नर्सरी प्रवेशासाठी रात्रभर 'परीक्षा'

विवेक मेतकर
शुक्रवार, 11 मे 2018

अकोला - पाल्याला नर्सरीत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी संपूर्ण रात्र जागून काढण्याची तयारी अकोल्यात केली आहे. गुरूवार (ता.१०) रात्री तब्बल १०० हून अधिक पालक होलिक्रॉस कॉन्व्हेंट शाळेच्या बाहेर फुटपाथवर बसून होते. 

अकोला - पाल्याला नर्सरीत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी संपूर्ण रात्र जागून काढण्याची तयारी अकोल्यात केली आहे. गुरूवार (ता.१०) रात्री तब्बल १०० हून अधिक पालक होलिक्रॉस कॉन्व्हेंट शाळेच्या बाहेर फुटपाथवर बसून होते. 

एप्रिल महिन्यापासूनच शाळांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. उमरी रोडवर असलेल्या होलिक्रॉस कॉन्व्हेंट शाळेत उद्या प्रवेश अर्ज मिळणार आहेत. या परिसरातील ही एक प्रतिष्ठीत शाळा मानली जाते. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पालकांची नेहमीच झुंबड उडते. मात्र प्रवेश मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने अर्ज दिले जातात. त्यामुळे या शाळेचा प्रवेश अर्ज मिळविणेही एक दिव्य असते. गुरूवारी रात्री तब्बल १०० हून अधिक पालकांनी हे दिव्य केले. सकाळी आठ वाजताच अर्ज मिळणार असल्याने गुरूवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच पालक प्रवेशासाठीच्या रांगेत लागले होते.

विशेष म्हणजे शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पालकांनीच स्वयंस्फूर्तीने ही रांग लावली होती. शाळा प्रशासनाकडून याबत कोणतीही सूचना नव्हती किंवा व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. संपूर्ण रात्र जागून काढण्याच्या तयारीनेच पालक आले होते. रात्र होऊ लागली तशी ही संख्या वाढू लागली. मध्यरात्री सुमारे १०० पालक शाळेबाहेरच्या फुटपाथवर रांगेत लागले होते. रांगेची शिस्त स्वतःहून पाळली जात होती. बहुतेकांनी अंथरूण पांघरूण आणले होते. काही जण तर मच्छर अगरबत्ती लावून बसले होते. अनेकांना घरच्या इतर लोकांनी रात्री जेवण आणून दिले होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि पालक रात्रभर थांबणार असल्याचे माहित असल्याने एक चहाची गाडीही येथे आली होती. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रत्येकच पालकांचा प्रयत्न असतो.

शहरात शासकीय अनुदानित असलेल्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेत. जुन्या शाळांचे शुल्क तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे या शाळांना पालक प्राधान्य देतात. दरवर्षी प्रवेशाच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पालक रात्रभर रांगेत असतात, असे एका पालकाने सांगितले.

Web Title: parents waiting whole night for nursery admission