
वर्धा : वर्धा जिल्हा हा नागपूर शेजारचा जिल्हा आहे. नागपूरहून मोठ्या प्रमाणात रोजच कर्मचारी आणि व्यावसायिकांची ये-जा वर्ध्याला होत असते. कोरोना आजार आला नि "लॉकडाउन' जाहीर झाले. त्यामुळे सगळीच प्रवासी-वाहतूक थांबली. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारी वाहतूकही थांबविण्यात आली. तसेच शहारांतर्गत असलेली "लोकल' वाहतूकही थांबविण्यात आली.
मोठ्या शहरांतील प्रवासी वाहतूकीचे मुख्य साधन म्हणजे स्थानिक बस असते. परंतु छोट्या शहरांत प्रवाशांसाठी एकमेव आधार असतो तो "प्रवासी ऑटो'. वर्धा शहरात "ऑटो' हे प्रमुख साधन प्रवाशांसाठी आहे. लॉकडाउनमध्ये "ऑटो'सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतु परवापासून वर्धा शहरात "ऑटो'सेवा सुरू झाली. परंतु प्रवाशी जेव्हा "ऑटो'मध्ये बसायला गेले तर, दंग झाले! काय होते त्या "ऑटो'मध्ये? एक पडदा होता आणि त्या पडद्यामागे संशयास्पद हालचाल सुरू होती. तो प्रवासी आधी तर घाबरलाच. त्याने थेट "ऑटो'चालकाला विचारले, "भय्या, क्या है इस पडदे के पींछे?'
"लॉकडाउन'मध्ये संसर्ग टाळण्यासाठी "ऑटो'सेवा थांबविण्यात आली होती. परंतु संघटनेच्या मागणीनुसार आणि ऑटोचालकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करता "ऑटो'सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु परवानगी देताना एका फेरीत केवळ दोनच प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली. परंतु तो दोन प्रवासी वाहून नेणे आणि आधी होते तेवढेच कमी भाडे घेणे त्यांना परवडणारे नव्हतेच.
"लॉकडाउन'च्या आधी किमान पाच-सहा प्रवासी एका "ऑटो'मध्ये एका फेरीमध्ये वाहून नेले जायचे. त्यामुळे प्रत्येकाकडून किमान दहा रुपये घेतले तरी किमान साठ रुपये मिळायचे. परंतु आता दोन प्रवाशी प्रत्येकी दहा रुपये जर देतील तर, ते "ऑटो'चालकाला परवडेल तरी कसे? परंतु प्रशासनाने अट घालून दिली. त्या अटीचे पालन तर करावेच लागणार. परंतु दोन प्रवासी नेताना त्यांच्यामध्ये पडदा लावण्याची अटही घालण्यात आली. या अटीचे पालन काही "ऑटो'चालक करताना दिसतात. तर काही मुळीच करीत नाही.
"ऑटो' चालविताना आता "ऑटो'त बसणाऱ्या दोन प्रवाशांच्यामध्ये प्लॉस्टिकचा पडदा असणे अनिवार्य आहे. हा पडदा केवळ दोन प्रवाशांच्यामध्ये नाही तर चालकाच्या मागेही अनिवार्य आहे. शिवाय "ऑटो'त बसणाऱ्या प्रवाशाच्या हातांचे निर्जंतुकीकरण करण्याकरिता "सॅनिटायझर'चा वापर अनिवार्य आहे. "एवढी व्यवस्था करण्याची तयारी असेल तर ऑटो चालवा', असे फर्मानच जिल्हा प्रशासनाकडून सोडण्यात आले आहे. वर्धा शहरात अशी व्यवस्था करणारे काही "ऑटो'चालक दिसत आहेत. त्यांच्याकडून ही व्यवस्था करण्यात आल्याने प्रवासी भाडेही वाढविण्यात आले आहे आहे. त्या प्रवाशाचा "भय्या, क्या है इस पडदे के पींछे?' हा प्रश्न ऐकूण "ऑटो'चालकही हसला. तो म्हणाला, "अरे भाई, ये देखो. दुसरा पॅसेंजर बैठा है.' ...आणि मग ते तिघेही फिदीफिदी असले.
"ऑटो'त लावण्यात येत असलेला पडदा पारदर्शक असावा. यात आजूबाजूला बसलेले प्रवासी एकमेकांना दिसावे आणि "ऑटो'त मागे कोण बसले आहे, त्याच्या प्रत्येक हालचालीवर "ऑटो'चालकाला लक्ष ठेवता येणे अपेक्षित असल्याचे शासनाने कळविले आहे. शासनाची सूचना सर्वच "ऑटो'चालकांना देण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महत्त्वपूर्ण बातमी - दिल्लीनंतर नागपुरात कोण करतेय मोहल्ला सभांची तयारी?
जिल्ह्यात तीन हजारांवर "ऑटो'
वर्धा जिल्ह्यात प्रवासी परवाना असलेले एकूण तीन हजार 345 "ऑटो' आहेत. शासनाच्या सूचनेनुसार या "ऑटो'चालकांना अशी व्यवस्था करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या रस्त्यावर धावत असलेल्या "ऑटो'चालकांनी ही व्यवस्था केली आहे. तर ज्यांच्याकडून ही व्यवस्था करण्यात आली नाही, अशांना ही व्यवस्था केल्याशिवाय "ऑटो' रस्त्यावर आणू नका, असे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना कशाचे निवेदन?
शासनाने आदेश काढले. त्यानुसार काही "ऑटो'चालकांनी ही व्यवस्था केली. याकरिता सुमारे चारशे ते पाचशे रुपयांचा खर्च येतो. सध्या "लॉकडाउन'च्या काळात एवढे पैसे लावणे अडचणीचे आहे. ही व्यवस्था केल्यावरही दोन प्रवाशांची परवानगी असल्याने "ऑटो' चालविणे परवडत नाही. भाडे वाढविले तर देण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे "ऑटो'चालक चांगलेच अडचणीत आले आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना निवेदन सादर केले. पण, त्याचा काहीच लाभ नाही.
-देवा निखाडे,
अध्यक्ष, ऑटो युनियन, वर्धा
...तर दंडात्मक कारवाई
शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्य्रातील "ऑटो'चालकांना पारदर्शक पडदे लावण्याची सूचना केली आहे. त्यानुसार काही "ऑटो'चालकांनी पडदे लावले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात नव्याने सूचना केल्या आहेत. यानंतर पडद्याविना "ऑटो' चालविताना दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-विजय तिरणकर,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.