दिल्लीनंतर नागपुरात कोण करतेय मोहल्ला सभांची तयारी?

Who plan to organize mohalla sabha in Nagpur after New Delhi?
Who plan to organize mohalla sabha in Nagpur after New Delhi?

नागपूर : "मोहल्ला सभा' हे "मॉडेल' दिल्लीत "आम आदमी पक्षा'ने राबविले. लोकांचा पैसा खर्च करायचा असले, तर त्याविषयी लोकांनीच निर्णय घ्यावा. कोणत्या कामावर किती पैसा खर्च करायचा, हे लोकांनी निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधींनी न ठरविता ते लोकांनीच ठरविले पाहिजे, या हेतूने मोहल्ला सभांचे आयोजन दिल्लीत करण्यात आले. मोहल्ला सभांचा हा "दिल्ली पॅटर्न' जगभर चर्चेत आला. "जे दिल्लीने केले ते नागपूर का करू शकत नाही?', हे एक आव्हान डोळ्यासमोर ठेवत आता नागपूर येथेही "मोहल्ला सभा' लवकरच सुरू होणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे. परंतु कोण आहे नागपूर शहरातील या मोहल्ला सभांचे आयोजक? आम आदमी पक्ष तर नक्कीच नाही.
 
मोहन हिराबाई हिरालाल हे नाव आपल्यापैकी अनेकांना ओळखीचे असतील. नाही तर डॉ. सतीश गोगुलवार यांना तर आपण नक्कीच ओळखत असाल. मोहन हिराबाई हिरालाल हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी ग्रामसभांचे एक यशस्वी "मॉडेल' गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील मेंढा-लेखा येथे राबविले. देवाजी तोफा हे मेंढा-लेखा येथील नागरिक. त्यांच्या मार्फतच मोहनराव यांनी या आदिवासी गावात ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेला काय अधिकार आहे हे दाखवून दिले. देवाजी तोफा आणि तेथील गावकऱ्यांनी ग्रामसभा घेत जल, जंगल, जमीन यावर ग्रामसभेचा अधिकार सिद्ध केला. त्यासाठी त्यांना मोठे आंदोलनही उभारावे लागले.

या कामी मोहन हिराबाई हिरालाल त्यांच्या पाठीशी आधार म्हणून उभे ठाकले. या आंदोलनाचे फलित म्हणजे ग्रामसभेला तेथील जंगलावर अधिकार मिळाला. जंगलातील बांबूवर अधिकार मिळाला. पूर्वी वनविभाग बांबू विकायचा. परंतु आता मेंढा-लेखाची ग्रामसभा बांबू विकते. या बांबूविक्रीतून पहिल्याच वर्षी ग्रामसभेच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले. प्रत्येक कुटुंबाला चार महिन्यांच्या एकाच हंगामात बांबू तोडण्याची रोजी म्हणून सरासरी तीस हजार रुपये मिळाले.

ग्रामसभेचे अधिकार सिद्ध केले आणि एक सामान्य आदिवासी गाव समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू लागले. ग्रामसभा गावांत करून दाखवू शकते, तर मोहल्ला सभा शहरात का करून दाखवू शकत नाही?, असा प्रश्‍न मोहन हिराबाई हिरालाल यांना पडला. मग त्यांनी डॉ. सतीश गोगुलवार यांच्यासोबत याविषयावर चर्चा केली. डॉ. सतीश गोगुलवार यांचे तर ग्रामसभांबाबत आणखीच मोठे काम आहे. 

काय केले डॉ. सतीश गोगुलवार यांनी?

डॉ. सतीश गोगुलवार यांची "आम्ही आमच्या आरोग्यासाठी' ही सामाजिक स्वयंसेवी संघटना आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात डॉ. गोगुलवार यांचे आरोग्यविषयक मोठे कार्य आहे. सोबतच त्यांनी कोरची तालुक्‍यात गावागावांत ग्रामसभांना अधिकार देण्याचे कामही केले. कोरची तालुक्‍यात तर त्यांनी ग्रामसभांचा महासंघ तयार केला. त्यांनी आणि मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर एक निर्णय घेतला गेला. दरम्यान दैनिक "सकाळ'मध्ये ग्रामसभा आणि मोहल्ला सभांना उद्देशून एक सदर प्रकाशित झाले होते. "जे गडचिरोलीला जमू शकते ते नागपूर शहराला का नाही?' असा सवाल या सदरातून लेखकाने केला होता. हाच धागा पकडत त्यांनी "सकाळ'च्या नमूद प्रतिनिधीसोबत मोबाइलवर संपर्क केला. त्यानंतरच नागपूर शहरात मोहल्ला सभा राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

मोहल्ला सभांवर 'झुम'संवाद

नागपूर शहरात मोहल्ला सभा आयोजित करण्याबाबत "झुम' कॉलवर मोहन हिराबाई हिरालाल यांनी एक संवादही नागपूर येथील सजग नागरिकांसोबत केला. यात प्रा. अरविंद सोवनी, संदेश सिंगलकर, अशोक यावले, अमिताभ पावडे, ज्येष्ठ लेखक आणि कवी श्‍याम माधव धोंड, ऍड. समीक्षा गणेशे, सुषमा भड, अतुल उपाध्याय, डॉ. सतीश गोगुलवार, जगजितसिंग थेट्टी आदी अनेक मान्यवर सहभागी झाले. संदेश सिंगलकर यांची नागपूर येथे "कॅग' नावाची नागरिक कृती समिती आधीच कार्यरत आहे. सिंगलकर समितीचे उपाध्यक्षही आहेत. लवकरच मोहल्ला सभा घेत नागपूर येथे एक दिल्लीसारखेच नवे "मॉडेल' निर्माण करण्यात येईल, असा निर्णयही या "झुम'संवाद मध्ये घेण्यात आला. नागपूर शहरात मोहल्ला सभांची खूपच आवश्‍यकता आहे, असे मत नागपूर येथीस सर्व सहभागी मान्यवरांनी मांडले. 

मोहल्ल्यात सुरक्षित वाटले तरच यश

प्रत्येकाला आपल्या कुटुंबात सुरक्षित वाटते. त्यामुळे आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक संचय केला जातो, तो कुटुंबातच केला जातो. ज्या दिवशी नागरिकांना आपल्या मोहल्ल्यात सुरक्षितता वाटेल किंवा अशी सुरक्षितता ते मोहल्ल्यात निर्माण करू शकतील, त्या दिवशी सर्वांना मोहल्ला आपलासा वाटेल आणि मग "मोहल्ला सभा' यशस्वी होतील, असे मत सामाजिक कार्यकर्ते अतुल उपाध्याय यांनी व्यक्त केले. थोडक्‍यात काय तर लवकरच नागपूर येथे मोहल्ला सभा होणार आहे. मोहन हिराबाई हिरालाल म्हणतात की, ""जो मोहल्ला आपली वाट बघत असेल, तिथपर्यंतच आपल्याला पोहोचायचे आहे. बघुया कोणत्या मोहल्ल्यातून आपल्याला हाक येते.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com