नाचू नको मोरा, शिकाऱ्यांचा पहारा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नागपूर - सीताबर्डीसह शहरातील महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी मोरपीस विक्रेत्यांची गर्दी दिसू लागली आहे. या मोरपिसांसाठी शेकडो मोरांची कत्तल करण्यात आल्याचा संशय पक्षिमित्र आणि वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.

नागपूर - सीताबर्डीसह शहरातील महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी मोरपीस विक्रेत्यांची गर्दी दिसू लागली आहे. या मोरपिसांसाठी शेकडो मोरांची कत्तल करण्यात आल्याचा संशय पक्षिमित्र आणि वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.

याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 
पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे.अनेकांनी त्यावर गाणी आणि कविता रचल्यात. छायाचित्रकार हे दृश्‍य टिपण्यासाठी कायम आतुर असतात. पण, हे नाचणारे मोर शिकाऱ्यांचे लक्ष्य बनू लागले आहेत. त्यामुळे ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच’ म्हणण्याऐवजी ‘नाचू नको मोरा, शिकाऱ्यांचा पहारा’ अशी म्हणण्याचे वेळ आली आहे.

मोरपिसाच्या एका जोडीसाठी १० ते २० रुपये आकारण्यात येत आहेत. एकाचवेळी विक्रीस आणलेली ही मोरपिसे आली कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. एका विक्रेत्यास विचारले असता ही मोरपिसे उत्तर प्रदेश आणि राजस्थानतून आणत असल्याचे सांगितले. शहराच्या आजूबाजूला असलेल्या जंगली भागात मोठ्या प्रमाणात मोर आहेत. त्यात व्हीएनआयटी, सेमिनरी हिल्स, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर, अंबाझरी उद्यानाचा परिसर, विमानतळ यासह शहराच्या २० किलोमीटर अंतरावरील जंगलात मोठ्या प्रमाणात मोर आहेत. या मोरांचीच तर यासाठी कत्तल झाली नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

जंगलातून पीस आणताना कोणी आढळल्यास त्याला पकडणे शक्‍य आहे. पिसांची एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी विक्री खरोखर संशय निर्माण करणारी आहे. ही पिसे येतात कोठून, याबाबत चौकशी करणे आवश्‍यक आहे. तसेच शेतातील पिकांवर फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळेही मोरांच्या जीवनसाखळीत बदल झाला आहे. ही चिंतेची बाब आहे.   
- रविकिरण गोवेकर क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प 

मोरांची पिसे गळतात. पण, ती तुरळक स्वरूपात असतात. गळून पडलेली पिसे ही विस्कटलेली असतात. पण, विक्रीस आलेली पिसे ही सरळ असल्याने मोरांची कत्तल करून ती विक्रीस आणल्याचा संशय आहे. 
- विनीत अरोरा, पर्यावरणप्रेमी

Web Title: peacock feather hunter