esakal | या प्रकल्पामुळे तब्बल २२ गावांच्या नागरिकांमध्ये आनंद; रोजगाराच्या संधीही वाढल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

people of 22 villages got water from lokbiradari project

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे कधीकाळी तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध होते. पण, पुढे तलावांचे महत्त्वच लोक विसरत गेले आणि हे तलाव कमी होत गेले

या प्रकल्पामुळे तब्बल २२ गावांच्या नागरिकांमध्ये आनंद; रोजगाराच्या संधीही वाढल्या 

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : कर्मयोगी बाबा आमटे यांच्यापासून सुरू झालेले आमटे परिवाराचे सेवाकार्य आता अनिकेत आमटेंच्या रूपात तिसऱ्या पिढीपर्यंत झिरपत आले आहे. भामरागडच्या लोकबिरादरी प्रकल्पात आदिवासी बांधवांची आरोग्यसेवा करतानाच त्यांच्या आर्थिक आजाराचे निदान करून त्यावरही उपचार करणे आवश्‍यक असल्याचे अनिकेत आमटे यांच्या लक्षात आले. त्यातूनच प्रारंभ झाला गावागावांत तलाव निर्मितीचा अनोखा उपक्रम. आता पाण्याने तुडुंब भरून राहणाऱ्या या तलावांमुळे शेतीला सिंचनाची सोय होण्यासोबतच आदिवासींना मत्स्यव्यवसायाच्या माध्यमातून उत्तम रोजगार प्राप्त झाला आहे.

हेही वाचा - ‘मम्मी-पप्पा मुझे माफ करो' असे म्हणत तिने संपवले जीवन.. पण असे काय घडले; जाणून घ्या 

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे कधीकाळी तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध होते. पण, पुढे तलावांचे महत्त्वच लोक विसरत गेले आणि हे तलाव कमी होत गेले. पण, अशा तलावांचे नाते समृद्धीशी आहे हे अनिकेत आमटे व त्यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या चमूने अचूक ओळखले. एखाद्या गावात तलाव निर्माण झाला, तर तहानलेल्या पिकांना पाणी मिळते, पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकणाऱ्या महिलांच्या पायांना विसावा मिळतो आणि मत्स्यव्यवसायातून अर्थार्जनही होते. म्हणून अशा बहुउपयोगी तलावांची निर्मिती लोकसहभागातून करण्याचे ध्येय लोकबिरादरी प्रकल्पाने नजरेपुढे ठेवले. 

२०१६ पासून आता २०२० पर्यंत जिंजगाव, कुमरगुडा, कोयनगुडा, हलवेर अशा २२ गावांत लोकबिरादरी प्रकल्पाने २२ तलाव निर्माण केले. त्यासाठी गावातील नागरिकांच्या श्रमासोबतच आधुनिक यंत्रांचाही उपयोग करण्यात आला. तलावामुळे शेतीला आणि प्यायला पाणी मिळू लागताच पुढे पाऊल टाकत गावातील नागरिकांना मत्स्यबिज वाटप करण्यात आले. 

तत्पूर्वी गावातील काही होतकरू उत्साही युवकांना पुण्याजवळच्या डिंबे धरणे येथे मत्स्यशेतीच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर शिस्तीत मत्स्यशेती करण्यात आली. आता मत्स्यशेतीच्या माध्यमातून प्रत्येक तलावातून दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळते. त्यामुळे ग्रामस्थांनाही गावातच रोजगार मिळाला. सुरुवातीला या सर्वांसाठी प्रकल्पानेच खर्च केला. 

या उपक्रमासाठी ग्रामसभाही निधी देते. पण, यातील किमान दहा टक्‍के रक्‍कम लोकांनी देणे बंधनकारक आहे. कारण फुकट मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व कुणालाच नसते. आपले चार पैसे गेले म्हणजे लोक अधिक काळजी घेतात. आता २२ तलावांवरच न थांबता हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानस लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी व्यक्त केला.

क्लिक करा - 'अहो, आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे?' कोणी उपस्थित केला हा सवाल; वाचा सविस्तर   

अधिक पिकाची सोय

पूर्वी सिंचनाअभावी अनेकजण धानासारखे एखादे पीक घेऊन त्यातच समाधान मानायचे. पण, आता तलावामुळे वर्षभर सिंचनाची सोय झाल्याने धानासोबतच इतर पीकही घेऊ लागले आहेत. शिवाय मत्स्यशेतीसोबतच भाजीपाला लागवडीची संधीसुद्धा मिळाल्याने उत्पादन वाढून उत्पन्न व समृद्धी निश्‍चितच वाढणार आहे.

एका तलावातून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही हा उपक्रम हाती घेतला. ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. आमच्या अपेक्षेप्रमाणे या उपक्रमाचे उत्तम परिणाम दिसत असून ग्रामस्थांना चांगला लाभ होत आहे. म्हणून हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा विचार आहे.
- अनिकेत आमटे,
 संचालक, लोकबिरादरी प्रकल्प, 
भामरागड, जि. गडचिरोली 

संपादन - अथर्व महांकाळ