'या' गावात पाऊस येताच गावकऱ्यांचा उडतो थरकाप, रात्र काढावी लागते जागून..काय आहे कारण..वाचा.. 

शंकर जोगी 
Tuesday, 21 July 2020

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्‍यात असणाऱ्या आष्टोना गावात पावसाळा म्हंटले की लोकांचा अक्षरशः थरकाप उडतो. पाऊस सुरु होताच येथील लोकांच्या मनात प्रचंड धडकी भरते. या गावातील लोकं अक्षरशः थरथर कापायला लागतात.

राळेगाव (जि. यवतमाळ) : पाऊस म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतात निसर्गरम्य ठिकाणे, दूर डोंगरातून हळुवार वाहणारे झरे, प्रचंड धबधबे , पावसाचा आनंद घेणारे लोकं आणि गरमागरम चहा ,कांदा भजी. पावसाळा म्हणजे कित्येकांचा आवडता ऋतू. मात्र प्रत्येकासाठी पावसाळा आनंददायी असेलच असे नाही. 

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्‍यात असणाऱ्या आष्टोना गावात पावसाळा म्हंटले की लोकांचा अक्षरशः थरकाप उडतो. पाऊस सुरु होताच येथील लोकांच्या मनात प्रचंड धडकी भरते. या गावातील लोकं अक्षरशः थरथर कापायला लागतात. लोकांना अख्खी रात्र जागून काढावी लागते. पण यामागचे कारण काय? पाऊस आला की असे काय घडते जे येथील नागरिकांची झोप उडवून जाते? 

आष्टोना गाव अतिशय लहान असल्यामुळे गावामध्ये कोणत्याही आवश्‍यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नाही. अशातच रात्री कोणी ग्रामस्थ अचानक आजारी पडल्यास किंवा काही अत्यावश्‍यक वस्तू आणण्यासाठी खैरी वडकी येथे आले असता त्यांना गावाच्या बाहेरच अडकून राहावे लागते. 

हेही वाचा- 'अपयशातच दडलाय यशाचा पासवर्ड'..असे का म्हणताहेत यवतमाळ जिल्हा परिषदेचे नवे सीईओ ..वाचा सविस्तर  

गावाला वेढले आहे नाल्याने 

राळेगाव तालुक्‍यातील आष्टोना गावाला चोहोबाजूने नाल्याने नदीसारखेच व्यापले आहे. नाला मोठा असल्यामुळे व त्या नाल्याला संरक्षित भींत नसल्यामुळे पुराचे पाणी सरळ गावात शिरते. या गावातून गेलेल्या नाल्यामध्ये देवधारी, डिंगडोह, रामपूर, डुक्कर पोड, या तलावांवरील धरणावरून पाणी येते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे दोन्ही नाल्याला भला मोठा पूर आला होता. त्यात गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. 

यापूर्वी आले होते भयंकर संकट 

2009-2010 मध्ये असाच मोठा पूर आला होता. त्यावेळी गावातील बैलजोडी, ट्रॅक्‍टर, शेती साहित्य व घरातील साहित्य वाहून गेले होते. याही वर्षी काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे दोन्ही नाल्याला भला मोठा पूर आला. जवळपास 5-7 वर्षानंतर असा पूर आला होता, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. पण यावेळी आलेला पूर हा गावातील अनेक लोकांचे नुकसान करून गेला. 

लोकप्रतिनिधींनी फिरकूनही पाहिले नाही 

पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तत्कालीन आमदार वसंत पुरके व खासदार भावना गवळी यांनी गावाला भेट देऊन लवकरच गावाला संरक्षण भींत बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तेव्हापासून कोणी फिरूनही पाहिले नाही. निवडणूक आली की सर्वांना या भिंतीबद्दल जाग येते. मात्र, ते दिवस गेले की सर्व विसरून जातात असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

नक्की वाचा- वाह रे कोरोना! आता सर्वसामान्यांचे खाण्याचेही वांदे.. भाजीपाल्याच्या दरवाढीने गृहिणींचे बिघडले बजेट...

म्हणून गावकऱ्यांचा उडतो थरकाप 

पाऊस सुरु झाला की येथे असलेल्या नाल्यांमध्ये धारणाचे आणि तलावांचे पाणी भरते. आता तर या नाल्यामध्ये धरण तलावाचे पाणी येत असल्यामुळे सातत्याने मोठ्या प्रमाणात पूर वाढणार असल्याचे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पूरस्थती अशीच राहिल्यास जीवाचा धोका आहे त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

नाहीतर उभारू जनआंदोलन 
आमच्या गावच्या नाल्यावर पूर आला की बाहेर गेलेले नागरिक घरी पोहोचू शकत नाही. पूर आला की संपूर्ण गावामध्ये पाणी शिरते. संपूर्ण कामे ठप्प पडतात. आजवर ग्रामस्थांनी यासाठी अनेकांकडे पाठपुरावा केला. अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी केवळ आश्‍वासने दिली. त्यांची पूर्तता झाली नाही. अशा परिस्थितीमुळे दरवर्षी संपूर्ण गावाच्या मनात पावसाळ्यात धडकी भरते. शासनाने याकडे लक्ष नाही दिले तर आम्ही जनआंदोलन उभारू. 
-शंकर वरघड, 
तालुकाप्रमुख, मनसे 
 
 

 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people in aashtona village have fear of flood after start raining