वर्ध्यात निर्माणाधीन स्टेडियम झालं दारूचा अड्डा; काळोखात उडतो सिगारेटचा धूर; पडतो बाटल्यांचा खच  

मोहन सूरकार
Friday, 18 December 2020

नगर परिषद असली तरी शहर विकासाच्या दृष्टीने शून्य आहे. जिल्ह्यात राजकारणाची दिशा आणि दशा बदलल्याने आणि सत्ताधारी नेत्यांमधील अल्पइच्छा शक्तीमुळे शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात शहराचा विकास पुरता खुंटला आहे.

सिंदी (रेल्वे) (जि.वर्धा) : शहराला प्राप्त दहा कोटीच्या विशेष निधीतून गत दोन वर्षांपासून येथे क्रीडांगणाचे बांधकाम सुरू आहे. सध्या बांधकाम सुरू आहे. हे अर्धवट बांधकाम गावातील मद्यपिंकरिता मदतीचे ठरू लागले आहे. येथे भरदिवसा आणि रात्रीला दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. तर गांजा आणि सिगारेट शौकिनांसाठी ही इमारत स्मोकिंग झोन बनत आहे. 

नगर परिषद असली तरी शहर विकासाच्या दृष्टीने शून्य आहे. जिल्ह्यात राजकारणाची दिशा आणि दशा बदलल्याने आणि सत्ताधारी नेत्यांमधील अल्पइच्छा शक्तीमुळे शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात शहराचा विकास पुरता खुंटला आहे. परिणामतः शहरात मुलभूत सोयीसुविधांचासुध्दा अभाव आहे. विकासाचा असलेला हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी तत्कालीन अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून 10 कोटींचा विशेष निधी मिळविला. 

क्लिक करा - पवित्र नात्याला काळिमा! सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार; नातवाला जीवे मारण्याची दिली धमकी

या निधीतून प्रामुख्याने नाल्या, सिमेंट रस्ते, बाल उद्यान, स्टेडियम, बॅटमिंटन टेनिस कोर्ट, माता मंदिर बायपास रोड, पिपरा (रोड) रुंदीकरण व सिमेंट (रोड), वानरदेव मंदिराजवळ घाटाचे बांधकाम, ग्रंथालय व अभ्यास कक्ष, प्रभागातील सिमेंट रस्ते, भुयारी नाल्यांसह व्यावसायिक गाळे निर्मिती आदी विकासकामाचे दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. या सोबतच कबड्डीचे माहेरघर असलेल्या सिंदी शहरात प्रकर्षाने अभाव असलेल्या क्रीडांगणाचा समावेश आहे. मात्र, स्टेडियम बांधकाम सुयोग्य नियोजनाच्या अभावामुळे आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे बांधकामाला अत्यंत उशीर होत असून बांधकाचा दर्जासुद्धा निकृष्ट असल्याचे शहरातील क्रीडापटूचे मत आहे.

येथे मॉर्निंगवॉकसाठी गट्टूचा सिमेंट कॉक्रेटमध्ये ट्रॅक बनविण्यात आला आहे. मात्र, या ट्रॅकवर लावलेल्या दोन गट्टू मधे उद्घाटनापूर्वीच मोठी गॅप पाहाला मिळते तर साईडिंगला तडे जात आहे. या क्रीडांगणाचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले.  

जाणून घ्या - काम करताना लघुशंकेसाठी गेलेली महिला परतलीच नाही; आरडाओरड होताच बसला धक्का

जनावरांनी फस्त केली रोपे 

स्टेडियमला संरक्षण भिंतीचे निम्मेच कुंपण असल्याने इतर खुल्या जागेतून गुरा-ढोरांचा येथे मुक्त वावर पाहायला मिळतो. यामुळे येथे पावसाळ्यात लावलेली झाडे या गुरांनी फस्त केली आहे तर मोकाट श्‍वानांचा वावर असल्याने जागोजागी घाण दिसते. शिवाय बैठक व्यवस्था आणि प्रवेशद्वार एकाच बाजूने असल्याने अडचणीचे ठरत आहे. बैठक मंचावरील दोन पायऱ्यांची उंची बरोबर नसल्याने प्रेक्षकांना त्रास होत असल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. आपत्ती काळासाठी स्टेडियमला दुसरे बाहेर पडण्यासाठी दार नसल्याने बांधकामात नियोजनाचा अभाव जाणवतो आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People are drinking wine at construction site of stadium in wardha