
यवतमाळकरांनो, जिल्ह्यात २५ दिवसांत पंधरा हजार जणांची कोरोनावर मात; भीती नको काळजी घ्या
यवतमाळ : वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. काही नागरिक अजूनही बिनधास्त असले तरी अनेकांच्या मनात कोरोनाबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना बरा होणारा आजार असून, त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात बाधित झालेल्यांपैकी 15 हजार 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा: अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...
गेल्या वर्षभरापासून शासन आणि प्रशासन नागरिकांना सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत. सामाजिक अंतर, वारंवार हात स्वच्छ धुणे, नियमित मास्कचा वापर, ही सुरक्षेची त्रिसूत्री आहे. दरम्यानच्या काळात लसही उपलब्ध झाली. आपल्याला कोरोना होणारच नाही, अशा थाटात वावरणाऱ्यांच्या जिवावर बेतत आहे. लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घेतली जात नाही.
दुखणे अंगावर काढले जाते आणि मग आपल्या हातात काहीच राहत नाही. कोरोनाला पराभूत करायचे असेल तर स्वत:ला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जवळपास प्रत्येक नागरिक भयभीत आहे. महिलांवर त्याचा फार परिणाम झालेला दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर आदींची समस्या निर्माण झाली आहे. कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्हचा दरही वाढला आहे.
याच भयभीत वातावरणात बरे होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. एक एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत एकूण 19 हजार 248 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 15 हजार 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अजूनही काही जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. भीतीच्या वातावरणात बरे होणाऱ्यांची आकडेवारी नक्कीच दिलासा देणारी आहे. मात्र, स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. स्व:ताच डॉक्टरांची भूमिका न घेता, शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेतल्यास नक्कीच बरे होता येते. त्यासाठी पॉझिटिव्ह विचार करून पुढाकार घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा: धक्कादायक! मद्यपींना दारू मिळेना; चक्क घेतात सॅनिटायझरचा घोट; चार दिवसात 7 जणांचा मृत्यू
दुखणे अंगावर काढायला नको
कोरोनासंदर्भात समाजमाध्यमावर विविध प्रकारचे मॅसेज व्हायरल होत असल्याने नागरिक भयभीत आहेत. आजारी पडल्यास नागरिक रुग्णालयाची पायरी चढत नाही. घरातील सदस्यही समजून न उमजल्यासारखे दुर्लक्ष करतात. अंगावर दुखणे काढल्याने अखेरच्या क्षणी रुग्णालयात जातात. त्यामुळे डॉक्टरांच्या हातातही काही राहत नाही. अंगावर दुखणे काढणे घातक ठरत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Web Title: 15 Thousand People Cure From Corona In 25 Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..