esakal | कोरोनाच्या चाचणीत असुविधेच्या झळा, उन्हात उभे राहून करावी लागतेय चाचणी

बोलून बातमी शोधा

people facing problem for corona test in wardha}

रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात येतात. अँटीजन चाचणीही करण्यात येते. त्यासाठी मागील बाजूला कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, येथे येणाऱ्यांना बसण्याची सुविधा उपलब्ध नाही.

कोरोनाच्या चाचणीत असुविधेच्या झळा, उन्हात उभे राहून करावी लागतेय चाचणी
sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : कोरोनाचा वाढता आलेख पाहता शासनाकडून चाचणी करणे सुरू केले आहे. चाचणीची सुविधा असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र येणाऱ्यांना असलेल्या असुविधेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. 

रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात येतात. अँटीजन चाचणीही करण्यात येते. त्यासाठी मागील बाजूला कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पण, येथे येणाऱ्यांना बसण्याची सुविधा उपलब्ध नाही. वाढत्या उन्हातच उभे राहून स्वॅब घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या बाबी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसत नाही काय, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

हेही वाचा - लग्नासाठी फक्त ३५ जणांना परवानगी, तर आठवडी बाजारही बंद

सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी कोरोना चाचणी करण्यास सांगण्यात येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना चाचणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातदेखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे. येथे स्वॅबदेखील घेण्यात येतात. त्यासाठी मागील बाजूला असलेल्या एका इमारतीत आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याच इमारतीजवळ एक शेड उभारून त्यामध्ये चाचणीसाठी येणाऱ्यांचे स्वॅब घेतले जातात. दररोज मोठ्या संख्येने येथे सांगण्यात आलेल्या चाचणीसाठी येतात. पण, येथे आल्यानंतर सर्वसामान्यांना सुविधांना सामोरे जावे लागते. येथे येणाऱ्यांसाठी बसण्यासाठी सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे आलेल्या व्यक्तींना उभे राहावे लागते. बरेचदा वेळ असल्यास त्यांना जमिनीवरच बसावे लागते. या परिसरात काडीकचरा वाढलेला आहे. अशा स्थितीत येणाऱ्यांची होणारी आबाळ संतापजनक ठरत आहे. 

हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; उपराजधानीत युवकाला अटक

ज्येष्ठ नागरिक, महिलांनाही होतो त्रास - 
कोरोना चाचणी करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलादेखील येतात. पण, या सर्वांनाच येथील असुविधांमुळे त्रास सहन करावा लागतो. चाचणीसाठी नंबर येण्याकरीता उन्हात उभे राहण्याशिवाय सध्या तरी पर्याय नसल्याने ही अडचण कोण सोडविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शल्य चिकीत्सकांच्या दुर्लक्षाचा कहरच -
जिल्हा शल्य चिकीत्सकांचे सध्या रुग्णालयातील असुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. रुग्णालयात होणऱ्या अशा असुविधा शल्य चिकीत्सकांना दिसत नाही काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. शल्य चिकीत्सकांच्या दुर्लक्षित धोरणामुळे रुग्णालयात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसल्याचे दिसते.