शेतातच काय, रात्री घराबाहेर पडायलाही लोक घाबरायचे, इतकी होती त्याची दहशत... 

मोनील देशमुख
Sunday, 19 July 2020

नुकताच सोनुली बूज येथील मारुती उईके या युवकावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर सावंगी पडगे, पळसगाव खुर्द येथे वाघाने धुमाकूळ घातला. पळसगाव खुर्द येथे वाघाने कुत्र्यावर हल्ला चढवला.

तळोधी (जि. चंद्रपूर) : सध्या खरिपाचा हंगाम सुरू आहे. शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असतानाच तळोधी परिसरातील काही गावांमध्ये वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वाघाच्या दहशतीने खरीप हंगामाची कामे अडून पडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतीत आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

तळोधी परिसरात सावंगी बडगे, पळसगाव खुर्द, जनकापूर, गंगासागरहेटी, बाळापूर, गोविंदपूर, सोनुली बूज, ओवाळा ही गावे आहेत. सर्व गावे अगदी पाच-सात किलोमीटर अंतरावर आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागूनच गावे आहेत. उन्हाळ्यापासून सावगी बडगे, पळसगाव, जनकापूर, गंगासागरहेटी, बाळापूर, गोविंदपूर, सोनुली बूज आणि ओवाळा परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाने आतापर्यंत गाय, म्हैस, बकऱ्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. आता त्याने आपला मोर्चा माणसांकडे वळविला आहे. 

अवश्य वाचा- गोष्ट एका अनोख्या लग्नाची! अकाली वैध्यव्य आलेल्या सुनेचे सासरच झाले माहेर

नुकताच सोनुली बूज येथील मारुती उईके या युवकावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर सावंगी पडगे, पळसगाव खुर्द येथे वाघाने धुमाकूळ घातला. पळसगाव खुर्द येथे वाघाने कुत्र्यावर हल्ला चढवला. मात्र, कुत्रा वाघाच्या तावडीतून सुटला. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर धानाचे पीक घेतले जाते. पेरणी, रोवणीची कामे सुरू आहेत. मात्र, वाघाची दहशत असल्याने शेतावर जाण्यास शेतकरी, शेतमजूर मागे-पुढे बघत आहेत. रात्री घराच्या बाहेर पडायलाही त्यांची हिंमत होत नाही. वाघाच्या दहशतीमुळे शेतीची कामे अडून पडली आहेत. वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

अवश्य वाचा- त्याची नजर पडली एका मुलाच्या आईवर; नंतर घडला हा प्रकार....

भद्रावतीत दारूसाठा जप्त 

नागपूर- चंद्रपूर मार्गावर एका वाहनातून पोलिसांनी दारूसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत तीन लाख रुपये आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. जीवन भालचंद्र चिकटे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. घटनास्थळावरून वाहनचालकाने पळ काढला. एमएच 1 एम 6671 हे वाहन भरधाव चंद्रपूरकडे जात होते. पोलिसांनी सुमठाणा परिसरात पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागप्रमुख अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, निकेश ढेंगे, राजेश वराडे यांनी केली. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people of five village was very panic due to tiger