कापूस उत्पादक क्षेत्रातील ‘टेक्सटाईल पार्क’ला केराची टोपली

कापूस उत्पादक क्षेत्रातील ‘टेक्सटाईल पार्क’ला केराची टोपली

यवतमाळ : वसंतराव नाईक (Vasantrao Naik) व सुधाकरराव नाईक (Sudhakarrao Naik) यांच्या रूपाने महाराष्ट्राला (Maharashtra News) दोन मुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून यवतमाळला (Yavatmal) नेहमीच गौरविण्यात येते. राज्याच्या राजकारणात नेहमीच यवतमाळ जिल्ह्याचा दबदबा राहिला आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी यवतमाळला मंत्रिपदाचा लालदिवा ठरलेलाच असतो. हा जिल्हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागला आहे. (people in yavatmal waiting for textile park in distrct)

कापूस उत्पादक क्षेत्रातील ‘टेक्सटाईल पार्क’ला केराची टोपली
अखेर 'त्या' सात बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

सद्यःस्थितीत खासदार भावना गवळी, खासदार बाळू धानोरकर, खासदार हेमंत पाटील हे तिघेही जिल्ह्याचे नेतृत्व करतात. एवढेच नव्हे तर येथे आमदारांचीही कमी नाही. विधानसभेचे सात व विधान परिषदेचे दोन असे एकूण नऊ आमदार जिल्ह्यात आहेत. राज्यमंत्री व राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले नेतेही येथे आहेत. तरीही, बेरोजगारांना आधार देऊ शकेल असा एकही मोठा उद्योग, प्रकल्प उभा राहू शकला नाही. हे खासदार, आमदार, मंत्री साऱ्यांचेच अपयश म्हणावे लागेल. नाही म्हणायला यवतमाळच्या एमआयडीसीत रेमंड उद्योग कसाबसा तग धरून आहे. टेक्सटाईल पार्कची घोषणा पाच वर्षांपूर्वी करण्यात आली होती. हा प्रकल्पही सध्या केराच्या टोपलीतच आहे. याला काय म्हणावे?

जिल्ह्यात हात विणकाम, विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, तूर ही पिके घेतली जातात. लाकूड, चुनखडी, कोळसा याद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपूल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात. यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची केंद्रे असली तरी उद्योगधंद्यांच्या नावाने वानवा आहे. परिणामी येथील तरुणांना रोजगाराच्या शोधात महानगरात जावे लागते. कोविडच्या काळात तर त्यांना महानगरांनी परत पाठविले. आता गावात काम नाही. महानगरे परत येऊ देत नाहीत. बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

उद्योगाच्या नावाने भूखंड घेतले ताब्यात

उद्योगांचा पाया मजबूत व्हावा म्हणून यवतमाळसह महत्त्वाच्या तालुक्यांत सरकारने एमआयडीसीमार्फत राखीव क्षेत्र तयार केले. ३० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एमआयडीसी सक्षम होऊ शकली नाही. नवे उद्योग येणे दूरच; जे सुरू आहेत ते एक-एक करून बंद पडत आहेत. अनेकांनी उद्योग सुरू करण्याच्या नावावर भूखंड ताब्यात घेऊन ठेवले आहेत.

हिंदुस्थान लिव्हर उद्योग बंद

यवतमाळात आज केवळ रेमंड, डेनीमचा उद्योग सुरू आहे. इतर लहान उद्योग नावापुरते आहेत. तर काही बंद पडले आहेत. हिंदुस्थान लिव्हरचा उद्योग येथे बंद पडून परराज्यात हलविण्यात आला. त्यामुळे हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. दुसरी पिढीही रोजगाराच्या दृष्टीने उपेक्षितच राहिली.

टेक्सटाईल पार्कचे दिवास्वप्नच

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा यासाठी टेक्सटाईल पार्कला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी जागाही मिळाली. गाजावाजा करून झालेली घोषणा हवेत विरली. टेक्सटाईल पार्कच्या नावाने मंत्री, खासदार नेहमीच बोलत असतात. मात्र, हा उद्योगही दिवास्वप्नच ठरत आहे.

वाहतूक साधनांअभावी उद्योगवाढीला ब्रेक

यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या भारी येथे विमानतळ आहे. त्याचा उद्योगवाढीला कोणताही फायदा झालेला नाही. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे कधी धावणार, हे कुणीही उघडपणे बोलत नाही. ब्रिटिशकालीन लेकुरवाळी शकुंतलाही बंद पडली. ब्रॉडगेज करण्याच्या बाता नेत्यांनी केल्या. प्रत्यक्षात घोडे पुढे दामटले नाही. वाहतूक साधनांच्या अभावामुळे उद्योगवाढीला ‘ब्रेक’ लागला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बोथबोडनमध्ये आत्महत्येचे पीक

यवतमाळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर बोथबोडन नावाचे गाव आहे. या गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. कोरडवाहू शेती आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे या गावात २००२ पासून आत्महत्येचे पीक आले आहे. या कालावधीत तब्बल २९ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे बोथबोडन देशपातळीवर ओळखले जाऊ लागले. काही वर्षांपूर्वी खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मणिशंकर अय्यर, श्री श्री रविशंकर आदींनी गावाला भेट दिली. मात्र, शेतकऱ्यांच्या जीवनामानात कोणताही फरक पडला नाही, अशी खंत अनुप चव्हाण, शंकर ढोरे, प्रल्हाद फुपरे, नागोराव दुमारे, जितेंद्र राठोड यांनी व्यक्त केली.

कापूस उत्पादक क्षेत्रातील ‘टेक्सटाईल पार्क’ला केराची टोपली
शिथिलतेत यवतमाळकरांना कोरोना नियमांचा विसर; बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी

दारूबंदी असलेले असेही गाव

गावगाड्यात भांडण-तंटे वाढीसाठी दारू प्रमुख कारण मानले जाते. गावात शांतता अबाधित राहण्यासाठी दारूबंदीची मागणी नेहमीच केली जाते. महिलांच्या आक्रमकतेमुळे दारूविक्रेते काही दिवसांपुरता गाशा गुंडाळतात आणि पुन्हा विक्री सुरू करतात. गहुली (हेटी) हे एक हजार लोकवस्तीचे गाव त्याला अपवाद आहे. तब्बल चाळीस वर्षांपासून गावात दारूबंदी आहे. दारू काढू देत नाही आणि विक्रीही करू देत नाही, असे सरपंच संदेश राठोड, अश्‍विन राठोड, मनोहर चव्हाण, अविनाश राठोड, आकाश राठोड, वसंता रामकोड, किसन डोंगरे यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून सातत्याने लाल दिवा मिळण्याची परंपरा आहे. शेतकरी आपल्या घामातून कापूस पिकवितो. त्या कापसावर प्रक्रिया करून उच्च दर्जाची कापड निर्मिती केली जाते. मात्र, जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाही. टेक्सटाईल पार्कची घोषणा झाली. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच त्यानंतर नोकरीसाठी परजिल्ह्याचीच वाट धरावी लागते. वृद्धापकाळात आपला मुलगा जवळ असावा, अशी पालकांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. राजकारण्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून टेक्सस्टाईल पार्कसह उद्योग उभारणीसाठी एकत्र यावे.
-प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, नगरसेवक तथा रुग्णसेवक, यवतमाळ

(people in yavatmal waiting for textile park in distrct)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com