यवतमाळ जिल्ह्यात चोरट्यांच्या कारवायांना ऊत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

सूरज पाटील
Friday, 9 October 2020

येथील टांगा चौकातील सचिन पालडीवार यांच्या शोरूममध्ये वरच्या माळ्यावरील खिडकीचे ग्रील तोडून तिजोरीतील रोख एक लाख ३५ हजार व ७० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या.

यवतमाळ : मागील काही दिवसांपासून शांत असलेले चोरटे पुन्हा रस्त्यावर उतरले असून, यवतमाळ शहरातील चोरीच्या घटनांत वाढ झालेली आहे. टांगा चौकातील दुकान फोडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. येथील आर्णी मार्गावरील सरस्वतीनगरातून महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोन्याची साखळी उडविण्यात आली आहे. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

येथील टांगा चौकातील सचिन पालडीवार यांच्या शोरूममध्ये वरच्या माळ्यावरील खिडकीचे ग्रील तोडून तिजोरीतील रोख एक लाख ३५ हजार व ७० हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या. याप्रकरणी सचिन पालडीवार यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

अधिक माहितीसाठी - नात्याला काळीमा फासणारी घटना, आपल्याच नातीवर अत्याचार करून आजोबाची आत्महत्या

बनावट ग्राहक बनून आलेल्या दोघांनी आठ लाख ३९ लाखांचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना काल सकाळी घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली. दोन्ही घटनांची शाई वाळत नाही तोच, आर्णी रोडवरील सरस्वतीनगरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या वैशाली टोपरे यांच्या गळ्यातून ३० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र उडविले. 

विशेष म्हणजे दुचाकीवर आलेले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

तरीही अवधूतवाडी पोलिस शांत

आर्णी मार्गावरील कृषीनगर परिसरात यापूर्वीदेखील पाच महिलांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार असलेल्या चोरट्यांनी उडविले होते. याच भागात किराणा दुकान फोडूनही लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेले असताना, अवधूतवाडी पोलिसांना अजूनही चोरट्यांचा छडा लावता आलेला नाही. गुन्हेगारांच्या मुस्क्‍या आवळण्याचे सोडून येथील काही कर्मचारी स्वत:च्या हिताचे कारनामे करण्यासाठी नेहमी वादग्रस्त ठरतात.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people in yavatmal have fear of theft