महिला रेल्वे कर्मचाऱ्याचा छळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील कर्मचारी महिलेचा विभागातीलच कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. छळामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने यासंदर्भात अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. परंतु, त्याचा काहीच उपयोग न झाल्याने अखेर तिने लोहमार्ग पोलिसांकडे रीतसर लेखी तक्रार केली आहे. तक्रारीत त्रस्त करून सोडणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला आहे.

पीडित महिला नागपूर रेल्वेस्थानकाच्या पार्सल विभागात कार्यरत आहे. या विभागात कंत्राटी कर्मचारीही कार्यरत आहेत. पीडितेच्या तक्रारीनुसार कार्यालयीन अवधीत काही कर्मचाऱ्यांकडून असभ्य वर्तणूक करण्यात येत आहे. विभागातील 10 कर्मचाऱ्यांसह एकूण 12 जणांची नावे तक्रारीत नोंदविण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. प्रारंभी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, त्रास असह्य झाल्याने संबंधितांना माहिती दिली. परंतु, उपयोग झाला नाही. यामुळे अखेर वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याने तिने अखेर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. त्यासंदर्भात डीआरएम कार्यालयातील संबंधितांसोबत चर्चा करीत माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेतल्याने विभागात एकच खळबळ उडाली असली तरी या विषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार डीआरएम कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत घटनेची माहिती पोचली आहे. त्यांच्याकडूनही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने कर्मचारी महिलेच्या छळाची माहिती आली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण, महिलेने प्रशासनाकडे तक्रार दिली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Persecution of a female railway worker