किटकनाशक फवारणीमुळे बेडकांची "डराव डराव' धोक्‍यात

 Pesticides spray the frogs into danger
Pesticides spray the frogs into danger

गडचिरोली : शेताच्या पिकातील धोकादायक कीटकांचा फडशा पाडून शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणारा बेडूक शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. पण, गेल्या काही वर्षांत पिकांवर घातक रसायनांनी युक्त कीटकनाशके फवारण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचा हा मित्र आता संकटात सापडला आहे. तसेच काही वर्षांत बेडकांच्या अनेक प्रजाती झपाट्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेडकांअभावी शेतातील कीटकांची संख्याही वाढत आहे. 
उभयचर प्राण्यांमध्ये समाविष्ट असलेला बेडूक विलक्षण आहे. अनेक बेडूक प्रजाती जमिनीत खोल निद्रावस्थेत जातात आणि पावसाळ्याची चाहूल लागताच प्रजननासाठी बाहेर येतात. म्हणून त्यांच्या प्रजनन काळात म्हणजे पावसाळ्यात बेडकांची "डराव डराव' ऐकू येते. पण, आता ही "डराव डराव' धोक्‍यात आली आहे. मध्यंतरी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने जगातील उभयचर प्राण्यांचे सर्वेक्षण केले असता त्यांना 32 टक्‍के प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात आले. मागील 17 वर्षांत 50 पेक्षा अधिक बेडकांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. अनुकूल असे वातावरण मिळत नसल्याने बेडकांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. आयुसीएनच्या संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील "बुलफ्रॉग'चाही समावेश आहे. बेडकाची कातडी अतिशय नाजूक व संवेदनशील असते. त्यामुळे त्याच्यावर बाहेरील प्रदूषण, कीटकनाशक फवारणीसारख्या रासायनिक द्रव्यांचा घातक परिणाम होतो. बेडकांचा अधिवास असणारी पाण्याची डबकी, झाडे, पाणथळ जागा मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. शेतातील किंवा डबके आदी ठिकाणांवरील कृमी-कीटक टिपणाऱ्या बेडकाला साप खातो. पण, बेडूक नष्ट होत असल्याने सापांच्या संख्येवरही परिणाम होत असून ही अन्नसाखळी संकटात आली आहे. 
कसा मिळणार संकेत? 
काही अभ्यासकांच्या मतानुसार जमिनीखाली स्वत:ला गाडून घेणाऱ्या बेडकाला पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्यावर ओल जाणवताच पावसाळ्याचे संकेत मिळतात. पण, वाढते सिमेंट-कॉंक्रिटीकरण, जमिनीची धूप, अतिक्रमण यामुळे पाणी जमिनीत खोल झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बेडकांना पावसाचा संकेत कसा मिळणार व ते प्रजनन कसे करणार, हाही मोठा प्रश्न आहे. 
अभ्यासकांचा अभाव
निसर्ग, पर्यावरण क्षेत्रात संशोधन करणारे अनेक असले, तरी सरीसृप, कीटक, उभयचर प्राण्यांच्या अभ्यासात गुंतणारे फार कमी असतात. साप, वाघ, बिबट पकडणाऱ्या किंवा त्यावर संशोधन करणाऱ्यांना सहज प्रसिद्धी मिळते. बेडकांवर संशोधन करणारे फारसे प्रकाशझोतात येत नाहीत. त्यामुळेही कदाचित हे घडत असावे. भारतात डॉ. एस. डी. बिजू हे उभयचर प्राण्यांचे सर्वांत मोठे संशोधक मानले जातात. त्यांनी बेडकांवर प्रचंड संशोधन केल्याने त्यांना "फ्रॉगमन' म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रात जालन्यातील रमण उपाध्याय व इतर काही मोजके अभ्यासक आहेत. 

``अनेक कारणांसह कीटकनाशक फवारणी हे बेडूक नष्ट होण्याचे एक प्रमुख कारण आहे. खरेतर बेडूक मोठ्या प्रमाणात कीटक खाऊन शेतकऱ्यांची मदत करतो. पण, शेतकरी कीटकनाशक फवारत असल्याने बेडूक मरत आहेत. बेडूक हा नैसर्गिक भक्षक दुर्मीळ झाल्याने कीटकांची संख्या वाढत आहे. कीटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी अधिक जहाल कीटकनाशक फवारत आहेत, असे हे दुष्टचक्र निर्माण झाले आहे.`` 
- रमण उपाध्याय, उभयचर अभ्यासक, जालना. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com