पेट्रोल, डिझेल पावणेदोन रुपयांनी वाढले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : सौदी अरेबियातील अरामको या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर 14 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याची झळ इंधनदरांना बसण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील पेट्रोलदर प्रतिलिटर 80 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 1.90 व 1.77 रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाचे दर चढे राहिल्यास येत्या काळात आणखी दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.
अरामकोवर झालेल्या हल्ल्यानंतर पेट्रोल व डिझेलदरात दररोज भर पडत आहे. इंधनदरात 16 सप्टेंबरपासून सलग वाढ सुरू झालेली आहे. सोमवारी पेट्रोलचे दर 30 पैशांनी तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढविण्यात आले. यामुळे नागपूरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर आता 79.52 रुपयांवर पोहोचला आहे. डिझेलदराने प्रतिलिटर 69.10 रुपयांची नोंद केली.
ड्रोनहल्ल्यामुळे अरामकोमधून होणाऱ्या इंधन उत्पादनावर कमालीचा परिणाम झाला आहे. या हल्ल्यानंतर अरामकोचे दैनंदिन इंधन उत्पादन घटले आहे. जागतिक बाजारात सौदीकडून होणाऱ्या इंधन पुरवठ्याचे प्रमाण पाच टक्के असल्याने अरामकोमध्ये निर्माण झालेली घट ही केवळ मध्यपूर्वेतील इंधन बाजारांसाठी नव्हे तर, एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी परिणामकारक ठरली आहे. कमी पुरवठ्यामुळे कच्च्या इंधनाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. ब्रेण्ट क्रूड ऑइलचे दर सध्या प्रतिबॅरल 65 अमेरिकी डॉलरच्या आसपास आहेत. अशीच स्थिती राहिल्यास दिवाळीपर्यंत 90 रुपयांच्या पलीकडे पेट्रोलचे दर जाण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol, diesel rate increased