Video : कॅमे-याचे क्लिकही थांबले; फोटोग्राफीच्या व्यवसायावर कोरोनाचे सावट

camera.
camera.

यवतमाळ  :‘मी गेल्या दहा वर्षांपासून फोटोग्राफीचा व्यवसाय करते. या व्यवसायावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मी स्टुडिओ उभारला आणि इतरांनाही रोजगार दिला. परंतु, ’कोरोना’मुळे आता स्टुडिओच बंद आहे. त्यामुळे माझ्यासह स्टुडिओतील कामगारांवरही बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. संचारबंदीमुळे फोटोग्राफी व्यवसायावर कशी अवकळा आली, याबद्दल येथील लोखंडी पुलाजवळ असलेल्या मंजुषा फोटो स्टुडिओच्या संचालक मंजुषा वनवे सांगत होत्या. तर, गेल्या वीस वर्षांपासून फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे येथील टिळक वाडीतील राजकुमार फोटो स्टुडिओचे संचालक राजकुमार गावंडे म्हणाले की, ’संचारबंदीमुळे मोठे आर्थिक संकट आले आहे. यावर्षी लग्नाचा संपूर्ण सीझन हातचा गेला. त्यामुळे आता  वर्षभर तरी बेरोजगार राहावे लागणार आहे. सरकारने या संकटाचा सारासार विचार करून सर्व व्यावसायिक फोटोग्राफर बांधवांना आर्थिक मदत द्यावी,’ अशी मागणीही गावंडे यांनी केली आहे.


फोटोग्राफी एकेकाळी प्रतिष्ठेचा व्यवसाय होता. कलेला व श्रमालाही प्रतिष्ठा होती. छंद म्हणूनही अनेक जण या व्यवसायात येत. काहींचा तर हा पिढ्यानुपिढ्यांचा व्यवसाय होता. यवतमाळातील आहुजा, वगारे व साठवणे कुटुंबांच्या तीन पिढ्यांमध्ये हा व्यवसाय आजही सुरू आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांत फोटोग्राफीच्या व्यवसायाने कात टाकली आहे. नवनवीन तंत्रज्ञान या क्षेत्रात आले आहे. या क्षेत्रांचे संपूर्ण डिजिटलायझेशन झाले आहे. महागडे कॅमेरे आले आहेत. संगणकाने हे क्षेत्रही व्यापून टाकले आहे. आता साध्या कॅमेर्‍याने फोटोग्राफी होत नाही. त्यासाठी डिजिटल कॅमेर्‍यांचाच वापर करावा लागतो. शिवाय, इतर साहित्यही डिजिटलच लागते. या साधनांची व कॅमेर्‍यांची किंमत लाखांच्या घरात असते. आज एक स्टुडिओ सुरू करायचा म्हणजे पाच ते दहा लाखांचे सहज भांडवल लागते. जिल्ह्यात असे शेकडो स्टुडिओ आहेत. अनेकांनी लाखो रुपयांचे खासगी बँका व राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतले आहे. काहींनी तर खासगी फायनान्सचेही कर्ज काढले आहे. त्यांचा व्याजदर 18 टक्क्यांवर आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ताही भरणे कठीण झाले आहे. परंतु, कोरोनामुळे आता फोटोग्राफी या व्यवसायावरच अवकळा आली आहे. हा व्यवसाय अचानकच ठप्प  झाला आहे. जिल्ह्यात किमान दोन हजार फोटाग्राफर्स या व्यवसायात आहेत. यवतमाळात तीन, पुसद व वणीला प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण पाच लॅब आहेत. एका लॅबवर किमान 20 लोकांचा उदरनिर्वाह चालतो. किमान शंभर कुटुंबे जगतात. शिवाय, व्हिडिओ एडिटिंग करणारे दोनशे, अल्बम डिझाईन करणारे दोनशे, 25 बाईंडर्स आदी हजारो लोकांवर लॉकडाउनमुळे बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. मुळात फोटोग्राफीचा व्यवसाय हा चार महिन्यांचा असतो. अलीकडे डिजिटलायझेशनमुळे मोबाईल कॅमेर्‍यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईलमध्येही चांगले कॅमेरे असल्याने वाढदिवस, साक्षगंध आदींसह छोट्यामोठ्या कार्यक्रमांचे छायाचित्रण मोबाईलनेच केले जाते. त्यामुळे फोटोग्राफीचा व्यवसाय संकटात सापडला आहे. फोटोग्राफी कला असल्याने अनेकांनी ही कला जोपासण्यासाठी या व्यवसायात पदार्पण केले. परंतु, या व्यवसायात आता आव्हाने वाढली आहेत. त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. जानेवारी ते जून हा सहा महिन्यांचा कालावधी फोटोग्राफरसाठी महत्त्वाचा असतो. आता लग्नप्रसंगातच प्रोफेशनल फोटोग्राफरला बोलावले जाते. त्यातही एप्रिल ते जून हा या व्यवसायातील सीझनचा काळ असतो. अनेकांनी लग्नाच्या ऑर्डर्स बुक केल्या होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. लॉकडाउन संपल्यावरही लोक भीतीपोटी लग्नकार्याला सोहळ्याचे स्वरूप देणार नाहीत. त्यामुळे फोटोग्राफरला पुढील वर्षभर तरी काम मिळणार नाही. किमान एक वर्षांसाठी तरी फोटोग्राफीचा व्यवसाय लॉकडाऊन झाला आहे. जिल्ह्यातील हजारो फोटोग्राफर बांधवांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यांना ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे.
आर्थिक मदत मिळावी
कोरोनामुळे फोटोग्राफीचा व्यवसाय पूर्णतः: ठप्प झाला आहे. विवाह सोहळे रद्द झाले आहेत. त्यामुळे सर्व ऑर्डर्सही रद्द झाल्या आहेत. शिवाय, मोबाइलमुळे या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. लग्नप्रसंग सोडले तर इतर प्रसंगी फोटोग्राफीसाठी मोबाईलचाच वापर केला जातो. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हौशी फोटोग्राफर असल्याने त्यांना फोटोग्राफर बांधवांचे दु:ख चांगले माहिती आहे. शासनाने सर्व फोटोग्राफर्सना मासिक पाच हजार रुपये जगण्यासाठी आर्थिक मदत द्यावी. तसेच त्यांच्या मुलांची शाळेची फी माफ करावी.
महेश बुरडकर,
अध्यक्ष, कॉटनसिटी फोटोग्राफर क्लब, यवतमाळ.
भविष्याची चिंता वाटते
यावर्षी मी पावणेदोन लाखांचा नवीन कॅमेरा घेतला. त्यासाठी खासगी कर्ज घेतले. परंतु, लॉकडाउनमुळे लग्नाचा सिझनच गेला. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्‍न पडला आहे. सर्व ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. सिझनच हातचा गेला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षभर तरी काम मिळणार नाही. आता व्यवसायच लॉकडाउन झाल्याने भविष्याची चिंता वाटते.
मंजुषा वनवे,
मंजुषा फोटो स्टुडिओ, यवतमाळ.

वर्षभर रोजगार नाही
कोरोनामुळे फोटो स्टुडिओच लॉकडाऊन झाले आहेत. यावर्षीचा सिझनच हातचा गेला आहे. आता फोटोग्राफर्सना पुढील वर्षभर रोजगार मिळणार नाही. शिवाय, दुकानाचे भाडे, इलेक्ट्रिकचा खर्च, नोकरांचे पगार आणि बँकांचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शासनाने फोटोग्राफीचा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक मदत करायला हवी.’
राजकुमार गावंडे,
राजकुमार फोटो स्टुडिओ, टिळकवाडी, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com