सर्वसामान्यांसाठी कार्य करणाऱ्या या नेत्यासाठी 'भारतरत्न'ची मागणी, नाना पटोले घेणार पुढाकार

Pioneer of green revolution Vasantrao Naik
Pioneer of green revolution Vasantrao Naik

पुसद (जि. यवतमाळ ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते यांच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेच्या अतुलनीय कामगिरीसाठी वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणी शेतकरी व त्यांच्या चाहत्यांनी केली आहे. यासंदर्भात राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी किसान कॉंग्रेस चळवळ करणार आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मगाव गहुली असून, बंजारा या भटक्‍या जमातीतून पुढे येत त्यांनी सर्वाधिक साडेअकरा वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. शेतकरी, शेतमजूर, वंचित घटक व सर्वसामान्यांसाठी त्यांनी कार्य केले. देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई असताना आधुनिक शेती व हायब्रीड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण केले व महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवून दिली. आज त्यांनी साकारलेल्या हरितक्रांतीने भारत अन्नधान्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी रोजगार हमी योजना राबवली. तीच योजना आता केंद्राने स्वीकारली असून 'मनरेगा'मार्फत मजुरांना रोजगार मिळत आहे. धरणे, बंधाऱ्याच्या माध्यमातून जलसमृद्धी मिळविली. त्यांनी कृषी-औद्योगिक महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी केली. त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या लोककार्याचा सन्मान करण्यासाठी भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा, अशा शेतकरी व सामान्यजनांच्या भावना आहेत.

याच भावनांचा आदर करत कॉंग्रेसचे नेते विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात गहुली ते दिल्ली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या योजनेची सुरुवात ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या स्वाक्षरीने झाली. या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला व प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आला. मात्र तत्कालीन राज्य व केंद्रातील भाजपा सरकारने या प्रस्तावाची शिफारस राष्ट्रपतीकडे केली नाही. राष्ट्रपतींनी यावर निर्णय घेतला नाही.

या मोहिमेचे नेते नानाभाऊ पटोले हे सध्या आघाडी सरकार मध्ये विधानसभेचे सभापती आहेत. त्यांनी हा प्रस्ताव विधानसभेत सर्वानुमते मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केली आहे. स्वाक्षरी मोहिमेतील किसान कॉंग्रेसचे नेते देवानंद पवार यांनी हे अभियान कदापि थांबणार नाही असे सांगून स्वतः नाना पटोले हे वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कारासाठी मिळावा यासाठी आग्रही आहेत. नाना पटोले यांनी यासंदर्भात आपली भूमिका कार्यकर्त्यांजवळ स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडमुळे विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलल्याने तूर्तास हा निर्णय झालेला नाही. हा विषय नानाभाऊ स्वतः पुढे रेटतील, असा विश्वास देवानंद पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

हालचाली सुरू

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी किसान कॉंग्रेस चळवळ चालविणार आहे. या पुरस्कारासाठी स्वतः नानाभाऊ पटोले सकारात्मक असून राज्य विधिमंडळात ठराव पारित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष, किसान कॉंग्रेस, यवतमाळ

संपादित : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com