खड्ड्यात लावले नगरसेवकांच्या श्रद्धांजलीचे फलक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

चंद्रपूर : रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी खड्डे बुजविण्याचे अभियान सुरू केले. सोबतच त्या खड्ड्यात "नगरसेवकांना श्रद्धांजली' असे फलक लावले. येथील इंडस्ट्रिअल इस्टेट प्रभागात झालेल्या या अभिनव आंदोलनाची शहरात चर्चा सुरू आहे.

चंद्रपूर : रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी खड्डे बुजविण्याचे अभियान सुरू केले. सोबतच त्या खड्ड्यात "नगरसेवकांना श्रद्धांजली' असे फलक लावले. येथील इंडस्ट्रिअल इस्टेट प्रभागात झालेल्या या अभिनव आंदोलनाची शहरात चर्चा सुरू आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात इंडस्ट्रिअल इस्टेट प्रभाग क्रमांक सहा आहे. या प्रभागाचे प्रतिनिधित्व बसपचे प्रदीप डे, धनराज सावरकर, राजलक्ष्मी कारंगल, तर कॉंग्रेसच्या कलामती यादव करीत आहेत. या परिसरात रस्ते व इतर समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यांमुळे ये-जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले ये-जा करतात. खड्ड्यांमुळे अपघाताची घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न संतप्त नागरीक विचारित आहेत.
प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या असूनही एकही नगरसेवक त्याच्या पूर्ततेसाठी पुढाकार घेत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. अखेर, काही नागरिकांनी पुढाकार घेत स्वत: खड्डे बुजाओ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. प्रभागातील नगरसेवकांना श्रद्धांजली वाहत खड्डे बुजविणे नागरिकांनी सुरू केले.
प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे नगरसेवकांचे काम आहे. मात्र, येथील एकही नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव स्वत: पुढाकार घेऊन खड्डे बुजवावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planter tribute pane planted in a pit