पीएम मोदी जाहीर करणार देशातील वाघांची संख्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर : देशातील वाघांची संख्या व्याघ्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करणार आहेत. याकरिता 29 जुलैला दिल्ली येथील विज्ञान भवनात एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने देशातील 19 राज्यांमध्ये रेषा विभाजन पद्धतीने (लाइन ट्रॅन्झॅक्‍ट मेथड) व्याघ्र गणना केली आहे. व्याघ्रदिनी देशातील वाघांची संख्या जाहीर होणार असल्याचे वृत्त सकाळने प्रकाशित केले होते. त्यावृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. रेषा विभाजन पद्धतीने केलेली हा चौथी गणना आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने 2006 मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती. त्यानुसारच यावर्षीही जानेवारी 2018 पासून देशभरातील 19 राज्यातील जंगलात व्याघ्रगणना करण्यात आली. गणनेचे सर्व टप्पे राज्यातील वनविभाग राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीने पूर्ण झाले. त्यावर आधारित माहिती विश्‍लेषणाचे काम भारतीय वन्यजीव संस्थेच्या चमूंचे काम महिन्याभरापूर्वीच संपलेले होते. त्याचा आता अहवालही तयार झालेला आहे. व्याघ्रदिनाचे औचित्य साधून ही आकडेवारी जाहीर होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वच राज्यातील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना बोलविण्यात आलेले आहे. परंतु, चंद्रपूर येथे संत तुकाराम वनग्राम पुरस्कार आणि व्याघ्रदिनाचे आयोजन केले आहे. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारसह इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) यांना दिल्ली येथे जाणे शक्‍य नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांची बैठकही असल्याने वन विभागाने काही व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांना दिल्ली येथील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाठविणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi to announce the number of tigers in the country